शेतीला मागणी-पुरवठ्याचा आधार हवा; आमदार प्रकाश आवाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतीला मागणी-पुरवठ्याचा आधार हवा; आमदार प्रकाश आवाडे
शेतीला मागणी-पुरवठ्याचा आधार हवा; आमदार प्रकाश आवाडे

शेतीला मागणी-पुरवठ्याचा आधार हवा; आमदार प्रकाश आवाडे

sakal_logo
By

10734
कोल्हापूर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शेतकरी आघाडी व नेचर केअर फर्टिलायझरतर्फे आयोजित शेतकरी मेळाव्याचे उद्‍घाटन करताना आमदार प्रकाश आवाडे. शेजारी गोपाळ कुलकर्णी, गोविंद कुलकर्णी.


शेतीला मागणी-पुरवठ्याचा आधार हवा
आमदार प्रकाश आवाडे; ब्राह्मण महासंघ, ‘नेचर केअर’तर्फे शेतकरी मेळावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : बदलत्या काळानुरूप मागणी तसा पुरवठा, यावर आधारित शेती केल्यास निश्‍चित यश मिळते, असे प्रतिपादन जवाहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आज येथे केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शेतकरी आघाडी व विटा (जि. सांगली) येथील नेचर केअर फर्टिलायझर यांच्यातर्फे आयोजित ब्राह्मण शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सदगुरू विश्‍वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. कोल्हापूर जिल्हा शेतकरी आघाडीचे अध्यक्ष गोपाळ ऊर्फ य. वि. कुलकर्णी-उचगावकर अध्यक्षस्थानी होते. विश्‍वपंढरी सभागृह येथे मेळावा झाला.
आमदार आवाडे म्हणाले, ‘‘ऊस शेतीकडे प्राधान्याने लक्ष दिल्याने अन्य शेतीकडे दुर्लक्ष झाले आहे. शेतीत नवे प्रयोग होणे आवश्‍यक असून, खत, पाणी, कीटकनाशके यांचा संतुलित वापर करायला हवा. मातीची सुपीकता टिकवून पिकांचा पोत समजून घेतला पाहिजे. एखाद्याने केलेला प्रयोग यशस्वी झाल्यावर इतर शेतकरी त्याचे अनुकरण करतात. पहिला प्रयोग करण्यास शेतकरी पुढे येत नाहीत. सेंद्रिय शेतीचा पहिला प्रयोग झाल्यावर अनेकांनी सेंद्रिय शेतीवर लक्ष केंद्रित केले.’’
ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी ब्राह्मण महासंघाच्या कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘ब्राह्मण तरुणांना व्यावसायिक बनवणे, उद्योजकांना उत्पादन विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, ब्राह्मण उद्योजकांना एकत्र करणे या तीन आघाड्यांवर काम करत आहे. त्याचबरोबर आदर्श गाव करण्याच्या प्रकल्पासाठी राधानगरीतील पुंगाव दत्तक घेतले आहे.’’
नेचर केअरचे व्यवस्थापकीय संचालक जयदेव बर्वे यांनी सेंद्रिय शेती व शेतकऱ्यांपुढील आव्हाने, विषयावर मार्गदर्शन केले.
माती शास्त्रज्ञ अरुण मराठे यांनी ‘जमिनीची जडणघडण’ विषयावर अन्नाची प्रत मातीवर अवलंबून असल्याने मातीचे आरोग्य संतुलित राहावे, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. ऊस शास्त्रज्ञ डॉ. सुरेश माने-पाटील यांनी आधुनिक ऊस शेती, अनिल काळे यांनी करार शेती, नेचर केअरचे सुहास कार्लेकर यांनी पॉलिफॉस्फेट तंत्रज्ञान, अनिल कुलकर्णी यांनी आधुनिक व किफायतशीर शेती, तर महाराष्ट्र शासनाचे उपसंचालक रवींद्र पाठक यांनी अन्न प्रक्रिया उद्योग या विषयावर मार्गदर्शन केले. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी गाय म्हैस यांचे रोग व उपचार विषयावर विचार मांडले. किरण पाठक यांनी शेती अनुषंगिक शासकीय योजना व राहुल खोत यांनी शेतकरी, शेती आणि विमा विषयावर माहिती दिली. याप्रसंगी ब्राह्मण संघाचे माजी अध्यक्ष अरविंद कुलकर्णी, शरद फडके, श्रीपाद मराठे, प्रसाद कुलकर्णी, सुधीर चिवटे, लक्ष्मी पागनीस यांचा सत्कार झाला.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शामराव जोशी यांनी स्वागत केले. आदित्य मैंदर्गीकर यांनी सूत्रसंचालन केले. विवेक जोशी यांनी आभार मानले. या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष भालचंद्र लाटकर, लक्ष्मीकांत धडपले, हरिश शिंदे उपस्थित होते.