
सुषमा देसाई यांची प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती
प्रकल्प संचालक म्हणून
सुषमा देसाई यांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अर्थात डीआरडीएच्या प्रकल्प संचालकपदी सुषमा देसाई यांची नियुक्ती झाली. सध्या त्या सातारा जिल्हा परिषदेकडे याच पदावर कार्यरत होत्या. डॉ. रवी शिवदास हे सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रकल्प संचालकपदाची जागा रिक्त होती. या पदाचा तात्पुरता कार्यभार जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्याकडे देण्यात आला होता.
गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण विकास यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. प्रकल्पात अनागोंदी कारभार सुरू आहे. बचत गटाच्या महिलांची लुबाडणूक, त्याला जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हातभार यामुळे हा विभाग वादात सापडला आहे. हा विभाग जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात आणला जाणार आहे. अजूनही अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे येत असून, पुढील काही काळात या विभागातील बरेच गैरप्रकार चव्हाट्यावर येणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर देसाई यांच्याकडे या विभागाची जबाबदारी आली आहे.