
ढगाळ वातावरणाने आजारांना निमंत्रण
ढगाळ वातावरणाने
आजारांना निमंत्रण
धूलिकण, थंडीचाही संयुक्त परिणाम
सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : ऐन थंडीच्या दिवसामध्ये ढगाळ वातावरण व पावसामुळे आरोग्याच्या समस्येमध्ये वाढ झाली आहे. यातच नियमित ओळखीचे वाटणारे सर्दी, खोकला, ताप हे संसर्गजन्य आजाराव्यतिरिक्त काही गंभीर आजार डोकेवर काढू लागले आहेत.
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ शमल्यानंतर त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होऊन पुढील दोन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांसह विदर्भात काही भागांत पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. या अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे डिसेंबर महिन्यात संसर्गजन्य आजारात वाढ होत असून परिणामी स्वस्थ दिसणाऱ्या व्यक्तीदेखील काही आजारांना बळी पडत आहेत. आठ दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे अनुत्साही वाटणे, डोकेदुखी अशा आजारात वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, कफचे प्रमाण वाढले आहे. श्वसनासंबधी आजार, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लू आणि दम्याचे आजार या काळात उद्भवताना दिसत आहेत. मानसिक अस्थैर्य निर्माण होत असून नैराश्य, चिडचिडेपणा, डिप्रेशन आदी गोष्टी नागरिकांमध्ये बळावत आहेत. दमट वातावरणामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये बीपी कमी होऊन सातत्याने घाम येणे, दम लागणे, अशक्तपणा आदीसारखे विकार उद्भवत आहेत. शरीर संस्थांवर परिणाम होत आहे.
-----------------
असे आजार बळावताहेत..
- श्वसनसंस्था
बदलत्या हवामानामुळे परागकण, बुरशीजन्य कण, धूळ अशा हवेतून पसरणाऱ्या काही गोष्टी मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळे श्वसन संस्थेमध्ये अॅलर्जी निर्माण होऊन दमा, सर्दी, खोकला, ब्रॉन्कायटिस, सीओपीडी, न्यूमोनिया असे आजार बळावत आहेत.
- हृदयविकार व अर्धांगवायू
प्रदूषणामुळे निर्मित दूषित वायू, हवेत वाढलेले परागकण व इतर दूषित कणांच्या परिणामामुळे हृदयासंबंधी आजार होऊ शकतात. अचानक उष्णता वाढून हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, रक्तामध्ये गुठळ्या होणे असे गंभीर प्रकार उद्भवतात. त्यातूनच हृदयविकाराचा झटका आणि अर्धांगवायू या दोन्ही गंभीर आजारांचे प्रमाण वाढू शकते.
- कीटकजन्य आजार
हवामानातील बदलांचा परिणाम म्हणून विविध प्रजातीचे डास, माश्या, पिसवा यांच्या संख्येत खूप वाढ होऊन डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या आजारांच्या रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे.
- जलजन्य आजार
पाण्याचे प्रदूषण, महापूर, नाल्याचे पाणी थेट जलस्रोतात मिसळून पिण्याच्या पाण्यातील जंतूसंसर्ग वाढत आहे. यामुळे कावीळ, विषमज्वर, अतिसार, असे जलजन्य आजाराच्या तक्रारी आहेत.
--------------
कोट
सध्याचे वातावरण हे विविध आजारांना आमंत्रित करणारे आहे. योग्य काळजी न घेतल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. दूषित हवा, धूळ, थंडी व पाऊस यामुळे आरोग्यास अपायकारक स्थिती निर्माण झाली असून लहान मुले ज्येष्ठ नागरिकच नाही, तर सर्वच वयोगटातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. पल्लवी अडसूळ