
खमक्या आईच्या बहाद्दर पोरी...!
68957
भाजीपाला, फूल विक्रीतून सजवले आयुष्य
-
खमक्या आईच्या बहाद्दर पोरींची प्रेरक चित्तरकथा
संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : संभाजीनगरातल्या हकीम कुटुंबीयांत पहिली मुलगी जन्माला आली. तिचे नाव निलोफर. तिचे फारसे कौतुक झाले नाही. आई मुमताज मात्र खूश होती. दुसरा मुलगा होईल, अशी हकीम कुटुंबीयांच्या नातलगांना अपेक्षा होती. त्यावर पाणी फिरले आणि शबनमचा जन्म झाला. तिसऱ्या वेळी वंशाचा दिवा जन्माला येईल, अशी अपेक्षा ठेवली. खुशबूचा जन्म झाल्याने कुटुंबात आकाश पाताळ एक झाले. तिन्ही मुली जन्माला आल्याने त्यांच्यावर नाक मुरडणे सुरू झाले. त्याची पर्वा मात्र आईसह मुलींनी केली नाही. काबाडकष्टातून मुलींनी जमेल तितके शिक्षण घेतले. भाजीपाला, फूल विक्रीतून आयुष्याला सजवले. आईच्या पाठिंब्याने त्यांनी हार मानली नाही. रेसकोर्स नाक्यावरील कमानीजवळ फूल विक्रीच्या व्यवसायात राबणाऱ्या या बहिणींची ही कथा.
आईचे पाठबळ नसते तर...?
''सकाळी लवकर उठून मी बेकरीत कामाला जात होते. शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूलमधून मी दहावी उत्तीर्ण झाले. बारावीला वाणिज्य शाखेतून ५० टक्के गुण मिळवले. रेसकोर्स नाक्यावर फुलांची विक्री सुरू केल्यावर या मुलींचे डोके फिरले काय, अशी वाक्ये कानावर आली. त्याच्याशी आम्हांला देणे घेणे नव्हते. शिक्षण पूर्ण करून चांगले आयुष्य जगायचे, असे ठरवले होते. आई भाजीपाला विक्रीसाठी शहरात खुशबूला काखेत घेऊन फिरायची. शिळं अन्न खाऊनच आम्हाला झोपावे लागत होते. ही स्थिती आता बदलली आहे. आईने पाठबळ दिले नसते तर आमचे काय झाले असते?, असा विचार मनात येतो,'' निलोफर हुंदके देत सांगत होती.
ग्राहकांशी बोलण्याचे आईनेच दिले धडे...!
''आईचे कष्ट बघत होते. पहाटे पाच वाजता उठायचे आणि फूल विक्रीसाठी नाक्यावर जायचे. नववीपर्यंत शिकल्यानंतर स्वतःला भाजीपाला व फूल विक्रीच्या व्यवसायात गुंतवून घेतले. घरात आल्यावर कापुराचे पॅकिंग करत होते. माझे शिक्षण थांबले तरी चालेल निलोफर व खुशबूने शिकले पाहिजे, असे मला वाटत होते. ग्राहकांशी कसे बोलायचे याचे प्रशिक्षण आईने दिले. आजही खरेदीसाठी येणारे ग्राहक आमची ख्याली खुशाली विचारतात. गणेशोत्सवात खिरीचे मोदक, तर दिवाळीत फराळाचे अनेक डबे आमच्या घरात ग्राहक आणून देतात,'' शबनम भावुक होऊन बोलायची थांबली.
आई व शबनमने लावली बचतीची सवय...!
‘मी दहावीला ७० टक्के गुण मिळवले. आई व बहिणींनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झाले. कमला महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झाले. वखारीतून लाकडे आणून चूल पेटवत होतो. घरात धूर व्हायचा. अभ्यासात लक्ष लागायचे नाही. सकाळी लवकर उठून अभ्यास व पुन्हा फूल विक्रीसाठी जात होते. आईला जशी बचतीची सवय होती, तशी शबनमलाही. ती बचतीचे नवे प्रयोग सांगायची. आज आम्ही चांगल्या परिस्थितीत जगत आहोत. आमचे स्वतःचे घर आहे,’ खुशबूने आनंदाने सांगितले.