व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्याख्यानमाला
व्याख्यानमाला

व्याख्यानमाला

sakal_logo
By

फोटो-KPC22B11255
.....
राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला ... लोगो
....

विनोदाचे वरदान वापरून आनंदात जगा
श्‍याम भुर्के ः राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेस प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : ‘दु:खाचे पक्षी फडफड करणार असले तरी त्यांना हृदयात कायमची जागा करून देऊ नका. विनोद माणसाला मिळालेले वरदान असून, त्याचा वापर करून आनंदात जगा, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य श्‍याम भुर्के यांनी आज येथे दिला.
भास्करराव जाधव वाचनालयातर्फे आयोजित राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘चला जगूया आनंदाने’ या विषयावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. महापालिकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
भुर्के म्हणाले, ‘‘माणसाने श्रोते बनावे. तसे केल्यास काही ना काही ज्ञान मिळते. वागण्यातील क्लृप्त्या कळतात. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर रममाण होऊन काम करा. गंभीर वातावरणात अधिक विनोद निर्माण होतात. एक व्यक्ती आनंदी असेल, तर आजूबाजूचे लोकही आनंदी होतात. मनुष्य जन्म मिळाल्याचा अभिमान बाळगून रुबाबात राहा.’
ते पुढे म्हणाले, ‘‘बॅंकेतील लोक रुक्ष असतात, असा समज आहे. तेथील तणावाच्या वातावरणातही विनोद घडत असतात. संसारातही विनोदाचे किस्से घडतात. दिवाळी अंक कोणत्या विषयावर आहे, यावरूनही विनोद निर्माण होतात. आयुष्यात धावतपळत ध्येय गाठण्यापेक्षा चालत चालत ते गाठण्याचा प्रयत्न करा. सातत्याने कोणत्या ना कोणत्या कामात राहा.’’
यावेळी त्यांनी अभिनेता अशोक सराफ यांच्याशी झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला. महर्षी धोंडो केशव कर्वे स्त्री शिक्षणासाठी झटणारे असल्याने ते देणगीचे दहा रुपये आणण्यासाठी चालत कसे जायचे आणि त्यांच्या दीर्घायुष्याचा मंत्र कोणता, याची माहिती दिली. यावेळी आयुक्त कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त शिल्पा दरेकर उपस्थित होते.
------------
चौकट

वि. स. खांडेकर यांची भेट

‘मी नोकरीच्या निमित्ताने कोल्हापुरात बारा वर्षे होतो. त्या काळात ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यांना पत्र लिहून त्यांच्या राजारामपुरीतल्या घरी जाऊन भेटलो होतो. त्यांच्याकडून बँकेत ठेवीसाठी पन्नास हजार रुपये मिळवले होते, अशी आठवणही भुर्के यांनी सांगितली.
------------
चौकट

‘म्हणून काय झालं’ ...

‘तरी बरं..’, ‘म्हणून काय झालं’ व ‘चालायचंच’ हे शब्द लक्षात ठेवा. एखाद्याच्या मुलाला नव्वद टक्के मिळाले आणि तुमच्या साठ, तर त्याबद्दल मुलाचे कौतुक करा, असेही भुर्के यांनी सांगितले.
-------------

आजचे व्याख्यान
वक्ते : डॉ. अमर अडके
विषय : दुर्गवाटांवरची चार दशके
वेळ : सायंकाळी ६ वाजता