शिवसेना मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना मेळावा
शिवसेना मेळावा

शिवसेना मेळावा

sakal_logo
By

70753

कोल्हापूर : शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना पालकमंत्री दीपक केसरकर. शेजारी राजेश क्षीरसागर, शिवाजी जाधव, किशोर घाटगे, राहुल चव्हाण आदी.
...

संजय राऊत पंचाहत्तर टक्के राष्ट्रवादीचे
पालकमंत्री केसरकर : बाळासाहेबांची शिवसेनाच खरी शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : ‘उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणारी सहानुभूती खोटी असून, बाळासाहेबांची शिवसेनाच खरी शिवसेना आहे,’ असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले. संजय राऊत पंचाहत्तर टक्के राष्ट्रवादीचे, तर पंचवीस टक्के शिवसेनेचे असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात मेळावा झाला.
केसरकर म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांतील आत्मविश्‍वास जागा केला. त्यांनी हिंदुत्त्वाचे विचार गहाण ठेवले नाहीत. केवळ एक दिवस पंतप्रधान झालो तर काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द करेन, असे ते म्हणायचे. आम्ही त्यांच्या विचारांचे पाईक आहोत. प्रत्येक धर्मियांना समान अधिकार हवेत, हा त्यांचा विचार होता. त्यांच्या हिंदुत्त्वाची व्याख्या व्यापक आहे. त्यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला कधीच जवळ केले नाही. हिंदुत्त्ववादी विचारसरणीपासून उद्धव ठाकरे बाजूला गेल्याने आम्ही ऐतिहासिक उठाव केला.’
ते म्हणाले, ‘सेना-भाजपची युती म्हणून शिवसेनाला मतदान झाले. ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडूया, असे सांगत होतो. त्यांनी ते ऐकले नाही. त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आम्हाला खोकेवाला म्हणत असेल तर आम्हालाही उत्तर देता येते. सीमाप्रश्‍नी बाळासाहेबांची भूमिका स्पष्ट होती. मात्र, आता सीमाप्रश्‍नी राजकारणाची पोळी भाजण्याचे काम सुरू आहे. सत्तेवर आल्यानंतर आघाडीने मराठी माणसाच्या सुविधा बंद केल्या. लोकांना भडकविण्यापेक्षा त्यांना न्याय द्यायला हवा. या प्रश्‍नावर सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळवला जाईल.’

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘काँग्रेस व राष्ट्रवादीशी युतीची भूमिका पक्षप्रमुखांनी घेतल्याने अनेक कडवट शिवसैनिकांत घुसमट होती. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांच्या शिवसेनेची वाताहत होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत परिवर्तनाची लाट आणली. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री शिवसेनेचे असणे हे दुग्धशर्करा योग आहे.’

यावेळी जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, राहुल चव्हाण, शिवाजी जाधव, किशोर घाटगे, रणजित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अंकुश निपाणीकर, लोकनियुक्त सरपंच रेखा पोवार व तेजश्री बागडी यांचा सत्कार करण्यात आला.
...................
चौकट

अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण मातृभाषेतून

मातृभाषेतून अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण देण्यात येणार आहे. जर्मनी, रशिया, जपानमध्ये त्यांच्या भाषेत शिक्षण दिले जाते. तेथे नोबेल पारितोषिक विजेते नागरिक घडतात, असे केसरकर यांनी सांगितले.