वीज कर्मचारी संप

वीज कर्मचारी संप

खासगीकरणाविरोधात वीज कर्मचारी संपावर

जिल्ह्यातील चार हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ३ : खासगीकरणाविरोधात महावितरणमधील तीस कामगार संघटनांच्या सदस्यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून संप सुरू केला. कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले असून, त्यात बाराशे कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. संप ६ जानेवारीपर्यंत असणार आहे. दरम्यान, संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरण सज्ज झाले आहे.
वीजपुरवठ्याच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू केली आहेत. ती २४ तास कार्यरत राहणार आहेत. कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचे दिले आहेत.
संपकाळात वीजपुरवठा अखंडित व नियमित ठेवण्याकरिता महावितरणने नियुक्त केलेल्या एजन्सीचे कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता व कर्मचारी यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा विभागातील अभियंत्यांना विविध उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात आले आहे. महावितरणतर्फे नियुक्त ज्या एजन्सी संप काळात काम करणार नाहीत, त्यांना तत्काळ बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आला आहे.
----------------
चौकट

उपमुख्यमंत्री करणार आज चर्चा

संपात सहभागी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. ४) दुपारी एक वाजता मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात चर्चा करणार आहेत. सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन केले आहे.
------------

चौकट

वीज कर्मचारी संघर्ष
समितीचे आवाहन

महावितरण खासगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यात दरवाढ होईल. हा धोका ओळखून संप सुरू केला आहे. ग्राहकांनी मोबाईल चार्ज करून ठेवावेत. पाण्याच्या टाक्या भरून घेत धान्य दळून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी संघर्ष समितीने सोशल मीडियाद्वारे केले आहे.
.......
.......
औद्योगिक वीज ग्राहकांमध्ये संभ्रम

नागाव: वीज कंपन्यांच्या संपामुळे औद्योगिक वसाहतीमधील वीज ग्राहकांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्र सरकारबरोबर या संदर्भात उद्या दुपारी एक वाजता चर्चा होणार असली तरी आज रात्रीपासून संप सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीने कळविले आहे. विशेष म्हणजे ठेकेदार कंपन्यांनी या संपाला पाठिंबा जाहीर केल्याने रात्रीत वीजपुरवठा खंडित झाल्यास संप मिटण्याची किंवा तीन दिवस पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार आहे. संपाबाबत औद्योगिक संघटनांना किंवा मोठ्या प्रमाणात वीज वापर करणाऱ्या‍ ग्राहकांना वीज कंपनीने काहीच सूचना दिलेल्या नाहीत. जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांची संख्या लक्षात घेता वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दिवस-रात्र कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते, तरीही विविध कारणांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो, मात्र संबंधित अस्थापनाची तक्रार येताच वीज कर्मचारी तक्रारीचे निवारण करत पुरवठा सुरळीत करतात. औद्योगिक ग्राहकांना संपाची कल्पना नसल्याने रात्री तक्रार करतानाच त्यांना संप असल्याचे समजणार आहे. परिणामी वीज ग्राहकांची मोठी गैरसोय होऊ शकते.

याबाबत बोलताना ‘स्मॅक’ चे अध्यक्ष दीपक पाटील म्हणाले, ‘सोशल मीडियावर व्हायरल पोस्टच्या माध्यमातून वीज कर्मचारी संपावर जात असल्याचे समजले, मात्र वीज कंपनीकडून औद्योगिक संघटनांना कोणत्याही सूचना अथवा पत्रव्यवहार झालेला नाही. त्यामुळे औद्योगिक संघटनांना आपल्या सभासद उद्योजकांना सूचना करण्यात अडचणी आहेत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com