मैदानावर खेळाडू , मैदानाबाहेर समर्थक भिडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैदानावर खेळाडू , मैदानाबाहेर समर्थक भिडले
मैदानावर खेळाडू , मैदानाबाहेर समर्थक भिडले

मैदानावर खेळाडू , मैदानाबाहेर समर्थक भिडले

sakal_logo
By

11811, 11812, 11813

कोल्हापूर : मैदानावर खेळाडू भिडले 
कोल्हापूर : गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला 

....

मैदानावर खेळाडू, मैदानाबाहेर समर्थक भिडले 

पोलिसांचा लाठीमार; मैदानाला पोलिस छावणीचे स्वरूप 

कोल्हापूर, ता. २८ : कोल्हापूरचा फुटबॉल आणि वादविवाद, मारामारी हे समीकरण काही सुटत नाही. टप्प्याटप्प्याने सुरू असणाऱ्या श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीगच्या सामन्यादरम्यान आधी मैदानावर खेळाडू भिडले व नंतर समर्थकांनी अर्वाच्‍च्य शिवीगाळ करत प्रेक्षक गॅलरी व नंतर मैदानाबाहेर धुडगूस घातला. 
  छत्रपती शाहू स्टेडियम येथे केएसए फुटबॉल लीग स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील १८ वा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यामध्ये झाला. सामन्यादरम्यान सुरुवातीपासूनच दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये धुसफूस सुरू होती. सामना पुढे सरकेल तसा वाद वाढू लागला. दरम्यान, दोन खेळाडूंमध्ये झालेल्या वादामुळे संपूर्ण सामन्याचे चित्र पालटले. यानंतर पदोपदी वाद होत राहिला. महत्त्‍वाचा सामना असल्यामुळे संघाच्या पाठिराख्यांची संख्यादेखील लक्षणीय होती. यामुळे समर्थक देखील शिव्यांची लाखोली वाहत होते. सामना संपण्यासाठी काहीवेळ शिल्लक असताना दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांवर पुन्हा धावून गेले. यामुळे प्रेक्षक गॅलरीतून देखील पाण्याच्या बाटल्या व चप्पल फेकायला सुरुवात झाली. सामना संपल्याची घोषणा होताच संघातील अतिरिक्त खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक देखील मैदानावर आले व खेळाडूंच्या अंगावर धावून गेले. हे सर्व होत असताना पोलिस मैदानावरच होते. पोलिसांनी मैदानात जात खेळाडूंना वेगळे केले. मात्र खेळाडूंमधील भांडणे थांबली असली तरीही प्रेक्षकांमधील वाद विकोपाला गेला होता. येथून पोलिसांनी प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन मैदान मोकळे केले. मात्र या वादाची माहिती क्षणार्धात सर्वत्र पसरली व दोन्ही संघाचे समर्थक मोठ्या संख्येने गोळा झाले. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची जादाची कुमक मागवण्यात आली. मैदानाबाहेर समर्थक अधिक आक्रमक होऊ लागल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला.
...

चौकट 

मैदानातील चर्चा

काही दिवसांपूर्वी मनपा परिसरामध्ये फुटबॉलवरून वाद निर्माण झाला होता. यात माहिती अधिकार कार्यकर्त्यांला मारहाण झाली होती. हा राग मनात धरूनच दोन्ही संघांमध्ये सामान्यांच्या सुरुवातीपासून धक्काबुक्कीला सुरुवात झाली असल्याची चर्चा मैदानावर सुरू होती.
...

मुलांसह पालकदेखील भयभीत
शालेय राज्य स्पर्धा सुरू असल्याने तसेच केएसए परिसरामध्ये जिम्नॅस्टिक, टेबल टेनिस, लॉन टेनिस प्रशिक्षण वर्ग असल्याने येथे लहान मुले अधिक प्रमाणात होती. अचानक झालेली भांडणे, लाठीमार व पळापळीमुळे मुलांसह पालकदेखील भयभीत झाले होते.

चौकट 

गेटच्या बाहेर घेरून शेरेबाजी
शिवाजी तरुण मंडळचे खेळाडू परतत असताना काहींनी गेटच्या बाहेर घेरून शेरेबाजी केली. तसेच अर्वाच्‍च्‍य शिवीगाळ करत अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी तातडीने धाव घेत गर्दी हटवली. या वेळी बळाचा वापर करावा लागला.