अंतर्मनातील भक्ती जागवा, चमत्कार घडतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंतर्मनातील भक्ती जागवा, चमत्कार घडतील
अंतर्मनातील भक्ती जागवा, चमत्कार घडतील

अंतर्मनातील भक्ती जागवा, चमत्कार घडतील

sakal_logo
By

फोटो - KOP23L79646
कोल्हापूर : येथे मंगळवारी तपोवन मैदानावर आयोजित भक्ती उत्सवात साधकांशी संवाद साधताना आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर.

KOP23L79648
कोल्हापूर : तपोवन मैदानावर आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे मंगळवारी झालेल्या भक्ती उत्सवात सहभागी झालेले भक्तगण.
(बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)


अंतर्मनातील भक्ती जागवा, चमत्कार घडतील
---
श्री श्री रविशंकर; तपोवन मैदानावर उसळला भक्तीचा सागर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : अंतर्मनातील भक्तीला जागवा, जीवनात चमत्कार घडतील. जिथे भक्ती आहे तिथे भीती असत नाही. संकटे आली तरी हसत जगण्यासाठी सत्संगासह
ध्यान करा, असा कानमंत्र आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांनी आज येथे दिला. ध्यान म्हणजे सजगतापूर्वक विश्राम असून, त्याने रोग प्रतिकारक शक्ती पाच पटींनी वाढते. वीरता व शूरता असेल तर सफलता नक्की प्राप्त होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दि आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आयोजित भक्ती उत्सवात त्यांनी संवाद साधला. या वेळी भक्तीच्या सागरात हजारो भक्त न्हाऊन गेले. भक्तिगीतांच्या सुरात त्यांनी ध्यानाची अनुभूती घेतली. दरम्यान, उद्या (ता. १) सकाळी सातला महालक्ष्मी होम होणार आहे. तपोवन मैदानावर उत्सवाचे आयोजन केले.
श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘भक्तीची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात वीररस, भक्तिरस मोठ्या प्रमाणात आहे. भक्ती निरस नाही, ती सरस आहे. तिच्यात नवरस आहे. कोल्हापुरात १२ वर्षांपूर्वी भक्तीचा कुंभमेळा भरला होता. आता ज्ञानाचा कुंभमेळा जमला आहे. प्रत्येकाने अंतर्मुख होऊन ईश्वरतत्त्व शोधायला हवे. ज्ञान, भक्ती व कर्माला ध्यानाची जोड द्यावी. भक्तीत सहज ध्यान लागेल. त्यातून डोक्यातील चिंता मिटतात. भक्ती नसेल तर निरसता येते. विस्तवावर राख चढते, तसे भक्तीचे झाले आहे. भक्तीला फुंकर घालण्याची गरज आहे. सर्वांत प्रेम, आनंद, विश्वास असून, त्याला तणावामुळे बाधा येत आहे.’’
ते म्हणाले, की काळ गतीने पुढे जात आहे. आपण सर्वजण त्याबरोबर वाहत आहोत. कसे जगायचे, ही कला आहे. आयुष्यात संकटे खूप येतात. सुख व दु:ख येते. त्या स्थितीत डगमगायचे नाही, तर ढोल वाजवून पुढे जायचे आहे. जीवन क्षणिक असल्याचे कळल्यावर जीवनाला खेळ समजणारा देश भारत आहे. अन्य देश जीवनाला संघर्ष मानतात. जीवनाला लीला, आनंद मानले पाहिजे. जो हसतो, तो भारतीय आहे. त्याच्यात आत्मविश्वास ठासून भरला आहे. कारण तो ‘आम्ही ईश्वराचे ईश्वर आपला’ या न्यायाने चालतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आई, वडील व संतांचा सन्मान कसा करावा, याची शिकवण दिली. आज जी संस्कृती टिकली आहे, त्याचे श्रेय त्यांना जाते. मराठ्यांचा प्रभाव श्रीलंकेपर्यंत होता. तमिळनाडूचा राजवंश महाराष्ट्रातला आहे. मराठ्यांच्या संरक्षण कवचामुळे मंदिरे टिकली, असेही त्यांनी सांगितले.

मैदानावर उभारलेल्या मंचावर शिवलिंगासह करवीर निवासिनी श्री अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा यांच्या प्रतिकृती होत्या. त्यांचे पूजन श्री श्री रविशंकर यांनी केले. त्या वेळी ‘अंबाबाई व जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष झाला. या वेळी प्रज्ञा योगाचे प्रात्यक्षिक सादर करताना लहान मुला-मुलींनी डोळ्यांवर पट्टी बांधून चित्रे रंगवली. तसेच रंग, प्राणी ओळखले. क्युबिकचे कोडे सोडविले, तर स्केटिंग करीत उपस्थितांची वाहवा मिळवली.

रांगड्या संस्कृतीचे दर्शन
कोल्हापूरच्या रांगड्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शिवकालीन युद्धकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर झाली. १३० मुला-मुलींनी सांघिक लाठीचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. एका लहान मुलीने डोळ्यांवर पट्टी बांधून दुहाती लाठीचे प्रात्यक्षिक सादर केले. रणमर्द शिलेदार मावळ्यांनी ऐतिहासिक वेशभूषेत लक्ष वेधले. शेतकऱ्याच्या वेशभूषेतील भक्ताने श्री श्री रविशंकर यांच्याकडे सेंद्रिय गूळ सुपूर्द केला.

स्वयंसेवकांची दक्षता
उत्सवात सहभागी होण्यासाठी भक्त गण दुपारी चारपासून मैदानावर आले होते. तपोवन मैदानाभोवती गर्दीचा सागर उसळला होता. पार्किंगची ठिकठिकाणी व्यवस्था केली होती. शिवाय, आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक भक्तांना कसली अडचण येणार नाही, याची दक्षता घेत होते.

* श्री श्री रविशंकर म्हणतात...
- आकाश तत्त्वाने आनंद प्राप्ती
- मन आकाश व वायूतत्त्वाशी जोडलेले
- शुद्ध आहार, शुद्ध विचार महत्त्वपूर्ण
- मनाला चेहरा नाही, ती केवळ ऊर्जा
- आयुर्वेद, योग, कीर्तन, भजन, नैसर्गिक शेतीकडे वळा