
भन्नाट माणसं प्रेरक कहाणी
फोटो- 11953
-
लोगो- भन्नाट माणसं, प्रेरक कहाणी ः भाग २
-
ग्रीन हाऊस, कुक्कुटपालन ते ऊस शेती!
कृषी क्षेत्रात रमले अक्षय पोवार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : कोरोना काळात जिल्ह्यातील साठ ते सत्तर टक्के ग्रीन हाऊस बंद पडले. आर्थिक तोटा सहन किती करायचा, असा प्रश्न ग्रीन हाऊस मालकांसमोर होता. करवीर तालुक्यातील इस्पुर्लीच्या अक्षय शिवाजी पोवार यांनी मात्र फायद्याचे गणित बांधले नाही. मुळातच कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याची त्यांना आवड. त्यामुळे थोडा संयम ठेवून ग्रीन हाऊसमध्येच जम बसविण्याचे त्यांनी ठरवले. स्मार्ट प्रकल्पात इकॉनॉमिक्स कम अॅक्सेस टू फायनान्शियल अॅडव्हायझर म्हणून काम करताना त्यांनी ग्रीन हाऊससह कुक्कुटपालन, ऊस शेती व म्हैस पालनात स्वतःला गुंतवून घेतलंय.
पोवार यांचे शालेय शिक्षण गावातल्या विद्यामंदिर, तर माध्यमिक शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूलमधून झाले. रुकडीतील महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजमधून बी. एस्सी. झाल्यावर आकुर्डीतील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमधून अॅग्री बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
एम. एस्सी. अॅग्रीचे शिक्षण घेण्याचे त्यांनी ठरवले होते. त्याच दरम्यान तालुका कृषी अधिकारी कार्यालयात राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावर ते क्षेत्र सल्लागार म्हणून भुदरगड येथे रुजू झाले. ते भुदरगडमध्ये ते २०१७ पर्यंत कार्यरत होते.
शेतीशी संबंधित पद असल्याने त्या कामात त्यांना आनंद मिळत असला तरी स्वतः शेतीत काहीतरी करावे, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यातूनच त्यांनी ग्रीन हाऊस उभारण्याचे ठरवले. पंचवीस लाख रुपये खर्च करून त्यांनी ग्रीन हाऊस उभारले. त्यासाठी शासनाकडून त्यांना दहा टक्के अनुदान मिळाले. त्यांना २०१८ ला ग्रीन हाऊसमधून आर्थिक उत्पन्न मिळाले. कोरोनामुळे ग्रीन हाऊसचे काम ठप्प झाले. दोन वर्षे बॅकफूटला गेल्याची भावना कुटुंबीयांची झाली. शेतीत उभारलेल्या दुसऱ्या शेडनेटमध्ये पोवार यांनी मेथी, पोकळा, कोथिंबीरची लागवड केली. कोरोनानंतर ब्रोकोली, कलर कॅप्सिकेन, जरबेरावर लक्ष दिले. त्यांना एकोणीस गुंठ्यात तिसरे ग्रीन हाऊस मंजूर झाले आहे.
केवळ आर्थिक उत्पन्न मिळावे असा त्यांचा अट्टहास नाही. आवडत्या क्षेत्रात काम करता येते याचेच त्यांना समाधान आहे. कुटुंबीयांच्या परंपरागत कुक्कुटपालनाच्या व्यवसायातही त्यांनी लक्ष पुरवले आहे. विशेष म्हणजे मित्रपरिवारासह शेतकऱ्यांत ते कृषी क्षेत्रातील विविध बदलांची माहिती सांगण्यात कमी पडत नाहीत.
कोट -
गावात कृषी सेवा केंद्र असावे, ही इच्छा होती. त्यासाठी केंद्र सुरू केले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उपयोगाच्या विविध योजना सांगण्यात मला विशेष रस आहे. सुटी दिवशी ग्रीन हाऊस व शेतीत राबण्यात मिळणारे समाधान मोठे आहे.
- अक्षय पोवार