
फुटबॉल
83525
---
झुंजार क्लबचा ‘ऋणमुक्तेश्वर’वर विजय
पीटीएम-बालगोपाल सामना बरोबरीत; आज होणार स्पर्धेची सांगता
कोल्हापूर, ता. १७ : श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात झुंजार क्लबने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळावर २-० गोलने विजय मिळवला, तर अटीतटीच्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने पाटाकडील तालीम मंडळाला बरोबरीत रोखले. छत्रपती शाहू मैदानावर स्पर्धा सुरू आहे. शनिवारी (ता. १८) दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील सामन्याने स्पर्धेचा शेवट होणार असून, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते लीग विजेत्या दिलबहार तालीम मंडळ व उपविजेत्या संघांना गौरवण्यात येणार आहे.
पीटीएम विरुद्ध बालगोपाल संघांमधील सामना अटीतटीचा झाला. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना अखेर एक गोल बरोबरीत ठरला. ही बरोबरी साधत बालगोपाल संघाने साखळी फेरीच्या समाप्तीअखेर ६ व्या स्थानावर कब्जा मिळवला. आक्रमक खेळ करणाऱ्या बालगोपाल संघाने पीटीएम संघावर गोलसाठी सातत्याने प्रयत्न केले. यात व्हिक्टर याने मारलेले अनेक फटके वाया गेले, तर काही फटके पीटीएमचा गोलरक्षक मोहम्मद याने अडवले. सामन्याचा पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात पीटीएम संघ अधिक आक्रमक जाणवला. याचा फायदा संघाला झाला. ओमकार मोरे याने ५१ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. यानंतर बालगोपाल संघाने काही आक्रमक चाली रचल्या. अखेर सामन्याच्या अधिकच्या वेळेत मिळालेल्या पेनल्टी किकवर व्हिक्टर याने गोल नोंदवत सामना बरोबरीत आणला.
झुंजार क्लब विरुद्ध ऋणमुक्तेश्वर यांच्यातील सामना एकतर्फी झाला. झुंजार क्लब संघाने आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड ठेवली. ३२ व्या मिनिटाला राजेश बोडेकर याने गोल नोंदवत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात झुंजार क्लबने लॉंग पासिंगवर भर देत ऋणमुक्तेश्वर संघाला खेळवत ठेवले. अखेर ६७ व्या मिनिटाला राकेश बोडेकर याने वैयक्तिक व संघासाठी दुसरा गोल करत २-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
आजचे सामने
दुपारी- २ ः फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध कोल्हापूर पोलिस.
सायंकाळी- ४ ः श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ.