
जल स्वच्छ अभियान
85482
कोल्हापूर : संत निरंकारी मंडळ कोल्हापूर विभागातर्फे खुपीरे तलाव परिसराची स्वच्छता करण्यात आली.
संत निरंकारी मंडळातर्फे
चोवीस ठिकाणी स्वच्छता
जिल्ह्यात ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियान
कोल्हापूर, ता. २६ : संत निरंकारी मंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे जिल्ह्यातील चोवीस ठिकाणी अमृत परियोजनेंतंर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियान आज राबविण्यात आले. देशातील सत्तावीस राज्ये व केंद्रशासीत ७३० शहरांत एकाच वेळी त्याची सुरवात झाली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राज पिताजी यांच्या हस्ते दिल्लीतील यमुना नदीच्या घाटावर त्याचा प्रारंभ झाला. कोल्हापूर विभागात चंबुखडी पाण्याची टाकी, खुपिरेतील ग्राम तलाव, वारणानगर येथे वारणा नदीचा घाट, नागणवाडी (ता. चंदगड) येथील सार्वजनिक विहीर, गगनबावडा येथील अणदूर तलाव, साळवाडी विभागात कासारी नदीचा घाट, सिद्धनेर्ली, सेनापती कापशी येथे स्वच्छता करण्यात आली. अन्य सोळा ठिकाणी अभियान राबविण्यात आले. ठिकठिकाणी पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या यांची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर घाट परिसरात वाढलेली झुडपे, गवत काढण्यात आले. मंडळाचे विभागीय प्रमुख अमरलाल निरंकारी, क्षेत्रीय संचालक शहाजी पाटील, श्रीपती जाधव, कऱ्याप्पा हराळे, शंकर चव्हाण, संभाजी भोसले, अशोक आहुजा यांनी संयोजन केले.
दरम्यान, सिद्धनेर्ली येथील दूधगंगा नदी काठाशेजारील परिसर संत निरंकारी सेवा दलाच्या दीडशेहून कार्यकर्त्यांनी स्वच्छ केला. सेनापती कापशी येथे चिकोत्रा नदी घाट व पुलाचा परिसर स्वच्छ केला.