
बुलाव डाव हाणामारी
फोटो
...
बुलाव डावमुळे रिक्षाचालकांत हाणामारी
कोल्हापूर, ता. २८ : मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील बुलाव डावमुळे आज रिक्षाचालकांत दगडफेक झाली. यामध्ये जखमी झालेला ओंकार पाटील याने अक्षय (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या ‘हंटर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तरुणाविरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रिक्षा थांब्यावर रांगेत न उभारता बाजूला येऊन प्रवाशांना बोलवून आपल्या रिक्षामध्ये घेण्याच्या प्रकाराला ‘बुलाव डाव’ असे म्हणतात. आज येथील बुलाव डाव आणि रिक्षाचालक या दोन गटांत वाद झाला. या वादात जखमी झालेल्या ओंकार पाटील आणि ‘हंटर’ या नावाने परिचित असलेल्या तरुणात वाद झाला. त्यानंतर रिक्षा संघटनांच्या नेत्यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे तब्बल १५ तासांनंतर रिक्षा व्यवसाय सुरू झाला.
पोलिस आणि रिक्षाचालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री मध्यवर्ती बसस्थानक थांब्यावर काही व्यावसायिक तरुण नेहमीप्रमाणे बुलाव डाव करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांना हटकत होते. त्यातून काही रिक्षाचालक आणि त्या तरुणांच्यात वादाची घटना घडली. रात्री घडलेल्या घटनेबाबत सकाळी बुलाव डाव करणाऱ्या काही रिक्षा व्यावसायिकांनी मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर शिवीगाळ करत दुसऱ्या रिक्षा व्यावसायिकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दरम्यान, वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक पाटील तसेच ७ ते ८ पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या समोरच मारामारीला सुरुवात झाली. त्यातून दोन्ही गटांत जोरदार दगडफेक झाली.
...
वाहतूक शाखेला पोलिस
निरीक्षकांची नेमणूक गरजेची
शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक हे पद सध्या रिक्त आहे. प्रभारी म्हणून कामकाज सुरू आहे. शहरातील वाढते पर्यटन, वाहतूक कोंडी, व्हीआयपींचे दौरे आणि आता बुलाव डाव सारखे प्रकार घडत असल्याने तातडीने वाहतूक शाखेला पोलिस निरीक्षकांची नेमणूक होण्याची गरज आज पुन्हा एकदा अधोरेखित झाली.