
तिळवणी उपोषण स्थगित
तिळवणी ग्रामस्थांचे उपोषण
दहा मार्चपर्यंत स्थगित
फिल्टर प्लँटच्या वीज जोडणीसाठी रक्कम देण्याचे आश्वासन
कोल्हापूर, ता. ४ : तिळवणी (ता. हातकणंगले) येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण दहा मार्चपर्यंत आज स्थगित केले. गावातील फिल्टर प्लँटच्या वीज जोडणीसाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळातून नऊ लाख पन्नास हजार रूपये तत्काळ देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले आहे.
उपोषणाचा आज चौथा दिवस होता. खासदार धैर्यशील माने, आमदार राजू आवळे, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव माने, माणगावचे राजू मगदूम, साजणीतील आप्पा पाटील यांनी उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली. फिल्टर प्लँटच्या वीज जोडणीसाठी नऊ लाख पन्नास हजार निधी जिल्हा नियोजन मंडळातून देण्यात येणार असल्याचे मगदूम व माने यांनी सांगितले. सरपंच राजेश पाटील, उपसरपंच दीपक गायकवाड, निवास कोळी, मंगल मिणचेकर, नीता चव्हाण, अरूणा कुंभार, मौसमी चव्हाण, शबाना एकसंबे, सिंधू माने, सुकुमार चव्हाण, विजय कदम, ग्रामसेवक सुजाता कांबळे, दगडू कदम उपस्थित होते. दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री व महावितरण मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत १० मार्चला मुंबईत बैठक होत आहे. त्यात गावाला नवीन वीज कनेक्शन जोडणी करुन देण्याबाबत चर्चा होणार आहे. तोपर्यंत उपोषणास स्थगिती दिली आहे.