मोफत फिरता दवाखाना लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत फिरता दवाखाना लोकार्पण
मोफत फिरता दवाखाना लोकार्पण

मोफत फिरता दवाखाना लोकार्पण

sakal_logo
By

फोटो - KOP23L87160
...

मला समजून घ्यायला खूप जन्म लागतील

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विरोधकांचा खरपूस समाचारः मोफत फिरता दवाखाना रुग्णवाहिकेचे लोकार्पण


सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ५ : ‘विरोधकांनो, मला समजून घ्यायला तुम्हाला खूप जन्म घ्यावे लागतील. मी कोठून पैसे आणतो, याचा शोध घेण्यापेक्षा लोकांची कामे करा. माझ्याकडून काही शिकायचे असेल तर लोकांच्या मदतीला धावून जा. त्यातून मते मिळतील की नाही, हे मलाही माहीत नाही. पुण्य मात्र नक्की मिळेल’, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. ‘विरोधकांना माझ्यावर टीका करुन प्रसिद्धी मिळणार असेल तर त्यांनी तीही करावी’, असा टोलाही त्यांनी लगावला.
भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित मोफत फिरता दवाखाना रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. दौलतनगरातील तीन बत्ती चौकात हा कार्यक्रम झाला.

मंत्री पाटील म्हणाले, ‘लोकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे काम पुण्याचे आहे. आरोग्यविषयक सेवा लोकांना उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. राजकारण बाजूला ठेवून हातात हात घालून करण्याचे हे काम आहे. पुण्यात आमदार झाल्यानंतर फिरते वाचनालय, फिरते ग्रंथालय सुरू केले. तेथे फिरता दवाखाना सुरू केल्यानंतर अनेकांनी माझ्यावर टीका केली. कोथरूडमध्ये गल्लोगल्ली डॉक्टर असताना त्याची गरज काय, असा प्रश्‍न उभा केला. मात्र, फिरत्या दवाखान्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज दिवसभरात १७१ जणांनी त्यात उपचार घेतले आहेत. फिरता दवाखान्यात केस पेपर केला जात नाही, की औषधाचे पैसे घेतले जात नाहीत. औषधे दवाखान्यात दिली जातात. काही औषधे डॉक्टरांनी लिहून दिली तर त्यात पन्नास टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे थेट चंदगडपासून लोक औषधे खरेदीसाठी कोल्हापुरात येतात.’

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘घरातील एखाद्या व्यक्तीला आजार उद् भवला तर घर कोलमडते. अशा लोकांसाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खूप काम केले आहे. त्यांच्याकडे आलेले कोणी रिकाम्या हाताने परत जात नाही. ते जे बोलतात तो शब्द पाळतात. मला राज्यसभेचे खासदार करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. ते पोकळ घोषणा करणारे नाहीत. याउलट, काहींना केवळ पब्लिसिटीची सवय आहे. राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या काळात एक रूपयाही निधी मिळाला नाही. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शंभर कोटी निधी जिल्ह्याला मिळाला.’
राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष नवोदिता घाटगे यांनी ग्रामीण भागातही या प्रकारच्या वैद्यकीय सेवेची आवश्‍यकता असल्याचे स्पष्ट केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी मंत्री पाटील हे पडद्यामागे राहून काम करणारे असल्याचे सांगितले. माजी नगरसेवक विलास वास्कर यांनी दौलतनगरमधील नागरिकांची प्रॉपर्टी कार्ड व्हावीत, अशी मागणी केली.
यावेळी माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी नगरसेवक सत्यजित कदम, विजय खाडे-पाटील, अशोक देसाई, विजय जाधव, संदीप देसाई, अशिष ढवळे, अजिंक्य चव्हाण, हेमंत आराध्ये आदी उपस्थित होते.
...........

संकटे आली, पण जनतेच्या
सेवेत पुन्हा कार्यरत

‘माझ्यावर अनेक संकटे आली. शाई फेकल्यानंतर तोंड धुवून पुन्हा जनतेच्या सेवेत कार्यरत झालो. चांगल्या कामासाठी मी रोज अंबाबाईकडे पैशासाठी प्रार्थना करतो. मात्र, दिवसभरात ते खर्च होतील, याची दक्षताही घेतो’, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.