महापालिका चषक फुटबॉल स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका चषक फुटबॉल स्पर्धा
महापालिका चषक फुटबॉल स्पर्धा

महापालिका चषक फुटबॉल स्पर्धा

sakal_logo
By

87574

जुना बुधवार, फुलेवाडीचा विजय
महापालिका चषक फुटबॉल स्पर्धा; अनिकेत जोशीने नोंदवले चार गोल

कोल्हापूर ता. ७ : महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली. संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळ संघाने कोल्हापूर पोलिस संघाचा धुव्वा उडवत ७ - १ गोल फरकाने विजय मिळवला. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने बीजीएम स्पोर्टस् संघावर २ -० गोल फरकाने एकतर्फी विजय मिळवला. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्‌घाटन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी किक ऑफ करून केले. यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, खासदार संजय मंडलिक, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.
जुना बुधवार पेठ विरुद्ध कोल्हापूर पोलिस सामन्याच्या पूर्वार्धात कोल्हापूर पोलिस संघाच्या अजित पोवार याने ३४ व्या मिनिटाला गोल नोंदवून १-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात संयुक्त जुना बुधवार पेठच्या अभिषेक भोपळे याने ४७ व ६९ व्या मिनिटाला गोल नोंदवले, तर अनिकेत जोशी याने ६६, ७४, ७५, ७६ व्या मिनिटांना असे एकूण चार गोल नोंदवत हंगामातील दुसरी हॅट्‌ट्रिक साधली. नीलेश सावेकर याने ७१ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामना ७ -१ असा केला. संयुक्त जुना बुधवार पेठच्या अनिकेत जोशी उत्कृष्ट खेळाडू ठरला.
अन्य सामन्यात फुलेवाडी संघाने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला मंगेश दिवसे याने मैदानी गोल नोंदवत सामन्यात आघाडी घेतली. या नंतर थोड्या वेळाने बीजीएम संघाला पेनल्टी बहाल करण्यात आली. मात्र, वैभव राऊत याने फटका गोल जाळीवरून मारत गोल बरोबरी साधण्याची संधी दवडली. सामन्याच्या उत्तरार्धात बीजीएम संघाचे गोल बरोबरी साधण्याचे प्रयत्न फोल ठरले, तर फुलेवाडीच्या रोहित मंडलिकच्या कॉर्नर किकवर आदित्य रोटे याने हेडद्वारे गोल नोंदवत सामना २ -० गोल असा एकतर्फी केला. आदित्य रोटे उत्कृष्ट खेळाडू ठरला.

चौकट
आजचे सामने
सकाळी ८ : प्रॅक्टिस विरुद्ध सम्राट नगर
दुपारी २.३० : महिलांचा प्रदर्शनीय सामना
सायंकाळी ४ : पीटीएम विरुद्ध खंडोबा तालीम