
विद्यापीठ व्याख्यान
फोटो
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना प्रा. चेतनसिंग सोळंकी.
...
मानवी अस्तित्वासाठी सौरऊर्जेकडे वळा
प्रा. चेतनसिंग सोळंकी : विद्यापीठात जी-२० युनिव्हर्सिटी कनेक्टअंतर्गत व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : ''मनुष्यजीवनाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने मानवाने पुन्हा शंभर टक्के सौरऊर्जेकडे वळायला हवे,'' असे प्रतिपादन ‘सौरमानव’ तथा ‘सोलर गांधी’ म्हणून प्रसिद्ध असलेले एनर्जी स्वराज्य फौंडेशनचे संस्थापक प्रा. चेतनसिंग सोळंकी यांनी आज येथे केले. ऊर्जा संवर्धनविषयक मोहीम जनआंदोलनाद्वारे यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातर्फे जी-२० युनिव्हर्सिटी कनेक्ट कार्यक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘हवामान बदल’ विषयावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी, तर प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील प्रमुख उपस्थित होते. राजर्षी शाहू सभागृहात व्याख्यान झाले.
प्रा. सोळंकी म्हणाले, ''ऊर्जा संवर्धनविषयक कार्यक्रम राबविणे, ही केवळ सरकारची जबाबदारी आहे, असे समजण्याचे कारण नाही. प्रत्येक मानव ऊर्जेच्या वापराला आणि ऱ्हासाला तितकाच कारणीभूत आहे. त्यामुळे तिच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. प्रत्येक जागरूक नागरिक एकत्र येऊन सौरऊर्जेसाठी आग्रही बनेल, तेव्हा त्या मोहिमेचे जनआंदोलनात रूपांतर होईल. ही इच्छाशक्ती निर्माण होणे, हीच आजची खरी गरज आहे.''
ते पुढे म्हणाले, ''आधुनिकीकरणाच्या नावाखाली कोळसा, तेल व तेलवायू यांचा वारेमाप वापर सुरू आहे. आज आपण वापरत असलेल्या ऊर्जेपैकी ८५ टक्के ऊर्जा खनिज इंधनांपासूनच निर्माण केली जाते. त्यामुळे वातावरणातील कार्बनचे उत्सर्जन दुपटीने वाढले आहे. यामुळे हरितगृह-वायू परिणाम होऊन तापमान वातावरणाच्या कक्षेत पकडून ठेवले जाते. या ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम एक-दोन नव्हे, तर तब्बल तीनशे वर्षे म्हणजे सुमारे दहा पिढ्यांना भोगावे लागतील.''
याप्रसंगी मानव्यविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. पी. सी. भास्कर, डॉ. एम. एस. भोसले उपस्थित होते. तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. एस. एन. सपली यांनी प्रास्ताविक केले. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
.........
....तर भयावह दुष्परिणाम
१८८० ते १९२० या कालावधीच्या तुलनेत आज पृथ्वीचे तापमान १.१९ अंश सेल्सिअसने वाढले आहे. अवघ्या सहा वर्षे ११३ दिवसांच्या कालावधीत ते १.५ अंश सेल्सिअसपर्यंत जाणार आहे. त्यापुढे ते दोन टक्क्यांपर्यंत जर गेले, तर त्याचे भयावह दुष्परिणाम संभवतात. त्यानंतर आपण काहीही केले तरी आपले जीवन पूर्ववत करू शकणार नाही. त्या दृष्टीने २ अंश सेल्सिअस तापमान म्हणजे मानवजातीच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठीची लक्ष्मणरेखा आहे. याच गतीने प्रदूषण करत राहिलो तर २१००पर्यंत पृथ्वीचे तापमान २.८ ते ६ अंश सेल्सिअसने वाढेल, असा इशारा सोळंकी यांनी दिला.
.............
प्रा. सोळंकींची सौरऊर्जेच्या प्रसारासाठी प्रतिज्ञा
प्रा. सोळंकी आयआयटी मुंबई येथे सौरविज्ञान विषयाचे प्राध्यापक असून सौर ऊर्जेच्या प्रचार व प्रसारासाठी भारतभ्रमण यात्रेसाठी बाहेर पडले आहेत. ते २०२० ते २०३० पर्यंत ही मोहीम राबविणार असून, तोपर्यंत कोणत्याही कारणाने घरी न परतण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सुसज्ज बसमधून त्यांनी मोहीम चालवली आहे. आज त्यांच्या मोहिमेचा ८३४ वा दिवस. मोहिमेदरम्यान त्यांनी विद्यापीठास आज भेट दिली.