
गुरू शिष्य प्रदर्शन
88630
अभिजात कलेचे महत्व कमी होणार नाही
डॉ. व्ही. एन. शिंदे : गुरू शिष्य चित्र-शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : विज्ञानात जनुकीय बदल शक्य आहेत. परंतु, अभिजात कलेचे मूल्य कधीही बदलणार नाहीत. व्यक्तीच्या आयुष्यातून कलेचे महत्व कधीही कमी होणार नाही, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले. राजर्षी शाहू स्मारक भवन येथील कलादालनात रेखासम्राट टी.के. वडणगेकर यांच्या २२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित चित्र-शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यात त्यांच्या हस्ते के. आर. कुंभार उपक्रमशील युवा कलाकार पुरस्कार जे. जे. स्कूलची विद्यार्थिनी चित्रकार प्रतीक्षा व्हनबट्टे यांना प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे होते.
विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर म्हणाले, ‘कलेशिवाय जगणं नाही. कलाकृती पाहून आनंद होत नाही, अशी एकही व्यक्ती नाही. कोल्हापूरी स्कूलने एका चौकटीत बंदिस्त झालेली चित्रकला बहुजनांसाठी खुली केली, हा गुरुशिष्य परंपरेचा शाहू विचार आजही सुरु आहे.’
ज्येष्ठ चित्रकार डॉ. मानसिंग टाकळे म्हणाले, ‘प्रत्येकाकडे स्वत:ची अभिव्यक्ती असते. आज स्वत:ची ओळख निर्माण करण्याच्या नादात आपल्या गुरुची ओळख पुसली जाते, याचे भान ठेवले जात नाही. परंतु गुरु हीच त्याची ओळख असते. ही समृध्द परंपरा पुढे नेण्यासाठी मोठी वाटचाल करावी लागेल.’
प्राचार्य अजेय दळवी यांनी कोल्हापूरी स्कूलची परंपरा उलगडली. यावेळी प्रफुल्ला डहाणूकर पुरस्कार मिळविणाऱ्या उपाध्ये, राम मेस्त्री तसेच मेरिट पुरस्कार मिळविणारे विजय टिपुगडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी के. आर. कुंभार यांचे नातू शुभम, ज्येष्ठ चित्रकार शिवाजी म्हस्के, आर्किटेक्ट मोहन वायचळ, इंद्रजित बंदसोडे, प्रकाश पुरोहित उपस्थित होते. मनोज दरेकर यांनी सूत्रसंचालन केले. नागेश हंकारे यांनी आभार मानले.
चौकट
यांच्या कलाकृतींचा समावेश
प्रदर्शनात विजय टिपुगडे, प्रतीक्षा व्हनबट्टे, इंद्रजित बंदसोडे, बबन माने, गजेंद्र वाघमारे, आरिफ तांबोळी, संतोष पोवार, किशोर राठोड, नागेश हंकारे, शैलेश राऊत, पूनम राऊत, मनोज दरेकर, अभिजित कांबळे, मनीपद्म हर्षवर्धन, प्रवीण वाघमारे, विजय उपाध्ये, राहुल रेपे, विलास बकरे, शिवाजी मस्के, चेतन चौगुले आदींच्या कलाकृती मांडल्या आहेत. हे प्रदर्शन शनिवार (ता. १८) पर्यंत सकाळी साडे दहा ते रात्री साडे आठ या कालावधीत खुले राहणार आहे.