महावितरण आवाहन

महावितरण आवाहन

प्रिय ग्राहक, आज रात्री तुमची वीज खंडित करू!
असे मेसेज महावितरण पाठवत नाही; सावधतेचे मुख्य अभियंता भागवत यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : ‘प्रिय ग्राहक, तुमचा विद्युत पुरवठा आज रात्री साडेनऊ वाजता खंडित केला जाणार आहे. तुमचे मागच्या महिन्याचे बिल भरलेले नाही. कृपया आमच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधा,’ असे आवाहन करणाऱ्या मेसेजसह मोबाईल क्रमांक आल्यास सावधान राहा. महावितरणतर्फे असा मेसेज पाठवला जात नाही. बनावट मेसेजना बळी पडू नका, असे आवाहन मुख्य अभियंता परेश भागवत यांनी केले आहे. ज्या क्रमांकावरून मेसेज पाठविण्यात येतात, त्याची तक्रार सायबर क्राईमकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
भागवत म्हणाले, ‘‘बनावट संदेशाद्वारे होणारी फसवणूक कशी रोखता येईल, याची माहिती महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. महावितरणकडून ग्राहकांना जो एसएमएस पाठविला जातो, त्यात मेसेज पाठविणाऱ्याच्या नावात स्पष्टपणे एमएसईडीसीएल असा कंपनीचा उल्लेख असतो. कधीही खासगी क्रमांकावरून एसएमएस किंवा व्हॉटस्‌ॲप संदेश पाठवला जात नाही. बिलासाठी एखाद्या नंबरवर अधिकाऱ्यास संपर्क साधण्यास सांगत नाही. कोणालाही फोनवरून ओटीपी विचारला जात नाही. ग्राहकाने वीज बिल थकले, तर त्याचा वीज पुरवठा पूर्वसूचना देऊन खंडित करण्याची महावितरणची नियमित पद्धती आहे. ताबडतोब बिल भरा, नाहीतर रात्री वीजपुरवठा खंडित करू, असे धमक्या दिल्यासारखे संदेश कधीही पाठवले जात नाहीत.’’
-----------------
चौकट
हे लक्षात घ्या...!
सायबर भामट्यांकडून पाठवलेल्या वैयक्तिक नंबरवर ग्राहकाने संपर्क साधला, तर त्याला त्याच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा ताबा घेता येईल, असे एनीडेस्क किंवा तत्सम ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. एखादी बनावट लिंक पाठविली जाते. त्याचा वापर करून भामटे ग्राहकाची बँकेविषयीची गोपनीय माहिती चोरतात. ग्राहकांनी ओटीपी शेअर करू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com