
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कधी होणार ?
आदर्श शिक्षक पुरस्कार
वितरण कधी होणार?
खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाची विचारणा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीतर्फे गेल्या तीन वर्षांपासून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर होऊनही पुरस्कारांचे प्रत्यक्ष वितरण झालेले नाही. या पुरस्कारांचे वितरण तत्काळ करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने आज केली. त्याबाबतचे निवेदन महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांना दिले.
तीन वर्षांहून अधिक काळ आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर होऊनही त्याचे प्रत्यक्ष वितरण झालेले नाही. महापालिकेकडे सर्व खासगी व मनपा शिक्षक संघटना यांच्या वतीने या प्रश्नाबाबत प्रशासनाधिकारी व आयुक्त यांना निवेदन देऊनही आजअखेर पुरस्कार वितरण झालेले नाही. सध्याचे शैक्षणिक वर्ष संपत आले असून, किमान यावर्षी तरी पुरस्कार वितरण सोहळा होणार का हाच प्रश्न आहे.
प्रशासनाधिकारी यादव यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये शहराध्यक्ष संतोष पाटील, जिल्हाध्यक्ष दस्तगीर मुजावर, सचिव नितीन पानारी, जिल्हा कार्याध्यक्ष धीरज पारधी, शहर कार्याध्यक्ष अभिजित साळोखे, विभागीय अध्यक्ष अशोक आरंडे, राज्य सचिव राजेंद्र कोरे, संदीप डवंग, संतोष कुंभार, दत्तात्रय मगदूम, गणेश बांगर यांचा समावेश होता.