
देश चालविण्यात स्त्रियांचे मोठे योगदान
फोटो - 89959
....
देश चालविण्यात स्त्रियांचे मोठे योगदान
डॉ. भारत पाटणकर ः श्रमिक सभागृहात स्त्री समता कायदा मेळावा
कोल्हापूर, ता. १८ : ‘स्त्रियांच्या घरकामाला सामाजिक जबाबदारी म्हणून प्रतिमहिना किमान चार हजार रुपये मिळाले पाहिजे. त्याची जबाबदारी शासनाने उचलायला हवी. कारण, देश चालविण्यात त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. यासाठी संघर्ष करूया,’ असे आवाहन डॉ. भारत पाटणकर यांनी आज झालेल्या स्त्री समता कायदा मेळाव्यात केले. प्रेम, मैत्री, करुणा आणि प्रेमाधारित स्त्रीमुक्तीचा कारवा या मेळाव्यात ते बोलत होते. स्त्रियांना राजकीय आणि आर्थिक समानता मिळावी यासाठी आज कष्टकरी स्त्रियांचा मेळावा झाला. श्रमिक सभागृहात त्याचे आयोजन केले होते.
डॉ. पाटणकर म्हणाले, ‘आपण श्रम करतो म्हणजे आपण आपली शक्ती विकतो आणि ही श्रमशक्ती पुनःपुन्हा वापरता यावी म्हणून आपल्याला मजुरी दिली जाते. महिला घरात काम करतात, पण त्यांच्या कामाला अजिबात मोल नसते. मजुरी नसते. त्या काम करतात म्हणून देशाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे आता राजकीय आणि सामाजिक समतेसाठी संघर्ष करावा लागणार आहे.’
परिषदेचे निमंत्रक हुमायून मुरसल म्हणाले, ‘व्यवस्थेने लादलेली गुलामी जोपर्यंत झटकून आपण बदलाला तयार होत नाही, तोपर्यंत स्त्रियांची मुक्तता होणार नाही. त्याची सुरुवात घरापासून व्हायला हवी, पण तसे होत नाही. त्यासाठी स्त्रियांना स्वावलंबी बनवणारा व त्यांच्या श्रमाचा सन्मान करणारा कार्यक्रम घेऊन लढावे लागेल. स्त्रियांच्या घरकामाला आज मोल नाही.’
रेहाना मुरसल म्हणाल्या, ‘स्त्रिया ज्या दिवशी आपल्या कामाचा मोबदला मागायला लागतील तेव्हाच पुरुषी व्यवस्थेला धक्का बसेल. आदिवासी समाज आपल्यापेक्षा कितीतरी पुढारलेला आहे. कारण त्यांच्यात समता आहे.’
रघुनाथ कांबळे, विद्रोही चळवळीचे नेते प्रा. संजय साठे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी फरझाना शेख, मुनिरा शिकलगार, यास्मिन देसाई, माधुरी पाटील, जरिना चौधरी उपस्थित होत्या. मेळावा यशस्वी करण्यासाठी बशीर पठाण, मुन्ना पठाण, दीपाली मगदूम, पुष्पलता पाटील यांनी परिश्रम घेतले. संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले.