क्रीडा संकुल प्रस्ताव मंत्रालयात अडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा संकुल प्रस्ताव मंत्रालयात अडला
क्रीडा संकुल प्रस्ताव मंत्रालयात अडला

क्रीडा संकुल प्रस्ताव मंत्रालयात अडला

sakal_logo
By

क्रीडा संकुल प्रस्ताव मंत्रालयातच
विकासाला फटका; खेळाडूंत नाराजी, पाठपुरावा करण्याची गरज
सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर, ता. २० : गतिमान सरकारचे क्रीडा धोरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा फटका कोल्हापूरच्या क्रीडा विकासाला बसत आहे. संकुलाच्या एका जागेच्या हस्तांतरण संदर्भात अडचणी आल्याने दुसऱ्या जागेसाठी दिलेला प्रस्ताव मंत्रालयामध्ये पुढे सरकण्याची वाट पाहतोय. यामुळे जिल्हा क्रीडा संकुल होणार, असे स्वप्न पाहणारे खेळाडू निराश होऊ लागले आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.     
जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी नियोजित जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागा हस्तांतरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. नियोजित संकुलासाठी आवश्यक असणाऱ्या शेंडापार्क परिसरातील जागेची मोजणी देखील करण्यात आली. मात्र, या जागेवर आधीच आरक्षण असल्यामुळे दुसऱ्या जागेचा शोध सुरू झाला. सध्या आयसोलेशन हॉस्पिटल रस्त्याशेजारील वाळू अड्ड्यामागील जागा यासाठी निवडण्यात आली आहे. याच्या मोजणीसह अन्य आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावावर कोणताच निर्णय होताना दिसत नाही. जिल्ह्याचा क्रीडा विकास व्हावा व कोल्हापूर जिल्हा ‘स्पोर्टस्‌ हब’ म्हणून नावारूपाला यावा, या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महानगरपालिका व क्रीडा संकुल समितीच्या प्रयत्नातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी आवश्यक असा आहे. २५ एकरांच्या या प्रस्तावित संकुलामध्ये पार्किंग, मुला-मुलींसाठी वसतिगृहे, बहुउद्देशीय हॉल प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र हॉल अशा सुविधा या सोबतच दिव्यांग खेळाडूंसाठी स्वतंत्र सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहेत. यासह स्पोर्टस्‌ सायन्स सेंटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या खेळ प्रकारातील खेळाडूंच्या शरीरावर आणि मानसिकतेवर होणाऱ्या परिणामाचा शास्त्रशुद्ध अभ्यास. त्यातून निघणाऱ्या निष्कर्षावरून खेळाडूंच्या क्षमता व एकाग्रता वाढीसाठी तसेच दुखापतग्रस्त होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या सेंटरमध्ये अत्याधुनिक क्रीडा साहित्यासह, डॉक्टर, फिजिओथेरपीस्ट, वर्कआऊट युनिट, हायड्रोथेरपीस्ट, स्पोर्टस्‌ सायकॉलॉजी विभाग, स्पोर्टस्‌ न्यूट्रिशनिस्ट यांचा समावेश असणार आहे.   
--------------
कोट 
जिल्ह्यासाठीचे हे क्रीडा केंद्र असून याद्वारे खेळाडूंना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. काही तांत्रिक मुद्यांवरून जागेसाठी पुनः प्रस्ताव सादर करावा लागला असल्यामुळे दिरंगाई झाली आहे. शिवाय नवीन प्रस्तावाचे वाचन होऊन मंजुरी मिळण्यावर या जिल्हा क्रीडा संकुलाच्या निर्मितीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी