
राजेश चषक फुटबॉल स्पर्धा आजपासून
राजेश चषक फुटबॉल स्पर्धा आजपासून
संयुक्त जुना बुधवार पेठ संस्थेतर्फे आयोजन
कोल्हापूर, ता. २० : संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्थेतर्फे ‘राजेश चषक’ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २१ मार्च ते रविवार २ एप्रिल दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे प्रमुख ऋतुराज क्षीरसागर व अध्यक्ष अनिल निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यामध्ये होणार आहे. ‘केएसए’चे चिफ पेट्रन शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांच्या प्रतिमेसह ७५ अंक असलेली कमान मैदानात उभारण्यात येणार आहे. तसेच अनेक वर्षांपासून मैदानावरील खाद्यपदार्थ विक्रेते, खेळाडू यांची पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. संतोष ट्रॉफी खेळलेल्या पाच खेळाडूंचा विशेष गौरव स्पर्धेच्या निमित्ताने होणार आहे. हुल्लडबाजी रोखण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. शिवाय शिस्तीचे पालन व्हावे, या हेतूने सोशल मीडियासह विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येणार आहे. या वेळी नागेश घोरपडे, उदय भोसले, महावीर पोवार, डॉ. ऋषीकेश पोळ, सचिन क्षीरसागर, सुशील महाडिक, संदीप राणे, कपिल नाळे, अक्षय केसरकर उपस्थित होते.