
संप मिटला, कर्मचारी कामावर
जिल्हा परिषदेत उत्साही
कर्मचाऱ्यांची कार्यालयात हजेरी
कोल्हापूर, ता. २० : गेल्या आठ दिवसांपासून जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला होता. जिल्हा परिषद कर्मचारीदेखील हजारोंच्या संख्येने संपात सहभागी झाले होते. सोमवारी दुपारपर्यंत या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या आवारात मंडप घालून जोरदार निदर्शने केली. यांनतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी महावीर उद्यानात बैठक घेतली. दरम्यान, शासन व संघटना यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याने हा संप मागे घेण्यात आला. त्यामुळे अनेक उत्साही कर्मचाऱ्यांनी कार्यालयात हजेरी लावत कामकाजास सुरुवात केली. संप मागे घेतल्याने मंगळवारपासून मिनी मंत्रालयाला गर्दीचा महापूर येण्याची शक्यता आहे.
जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी सरकारी कर्मचारी आठ दिवस संपावर होते. ऐन मार्च महिन्यातच संप पुकारल्याने विकासकामांची कोंडी झाली होती. जिल्हा नियोजन मंडळातून शेकडो कोटी रुपये मंजूर होऊनदेखील, संपामुळे विकासकामांची प्रक्रिया ठप्प झाली होती. गेल्या आठ दिवसांत केवळ खाते प्रमुख आणि कंत्राटी कर्मचारी यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावली. कार्यालयात एकही कर्मचारी नसल्याने खातेप्रमुखांची देखील मोठी गोची झाल्याचे पाहायला मिळाले. संपाची माहिती संकलित करण्यासाठी संपातीलच कर्मचाऱ्यांना बोलावण्याची वेळ प्रशासनावर आली होती. आता मात्र पुन्हा एकदा विकासकामांना जोर येणार आहे.