
''प्रॅक्टिस क्लब''चा विजय
90580
कोल्हापूर : राजेश चषक फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी फुटबॉलला किक मारून केले. या वेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, उदय भोसले, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, शिवाजी पाटील, जयवंत हारुगले. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
90582
कोल्हापूर : राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस विरुद्ध संध्यामठ सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा )
९०५८०,८२
‘प्रॅक्टिस क्लब’चा
‘संध्यामठ’वर विजय
राजेश चषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने संध्यामठ तरुण मंडळ संघावर २-० गोल फरकाने विजय मिळवला. छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या या सामन्याचे उद्घाटन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, अनिल निकम यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी शिवाजी जाधव, सुजित चव्हाण, शिवाजी पाटील, जयवंत हारूगले, उदय भोसले आदी उपस्थित होते. संयुक्त पेठ सेवाभावी संस्था आयोजित ही स्पर्धा आहे.
आक्रमक प्रॅक्टिस क्लब संघाने सातत्याने दबाव ठेवत सामन्यावर मजबूत पकड ठेवली. संध्यामठ संघाला संधी न देता एकतर्फी विजयाची नोंद केली. सामन्याच्या सुरुवातीपासून प्रॅक्टिस क्लबच्या आघाडी फळीने संध्यामठ संघाची मध्य फळी व बचाव फळी भेदत आक्रमण केले. सातत्याने आक्रमक चालींमुळे संध्यामठ संघाचे नियोजन कोलमडले. यातच प्रॅक्टिस क्लबच्या मध्य फळीने ठोस भूमिका बजावत संध्यामठ संघाला चांगले थोपवून धरले. सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला चिमा याने गोल नोंदवत संघाला एक गोलने आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात सामना सुरू होताच प्रॅक्टिसच्या रोहित भोसलेने ४१ व्या मिनिटाला गोल नोंदवून सामना २-० असा केला. यानंतर संध्यामठ संघाने रणनीतीमध्ये बदल केले. याचा फायदादेखील झाला. संध्यामठच्या मध्य फळी व आघाडी फळीने सूत्रबद्ध खेळ करत प्रॅक्टिस क्लबची बचावफळी भेदून गोलजाळीवर आक्रमण केले. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. सोबतच प्रॅक्टिस क्लबच्या आणखी दोन गोल संधी वाया गेल्या. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहत प्रॅक्टिस क्लबने विजय मिळवला. संध्यामठ संघाच्या सौरभ हारुगलेला लढवय्या खेळाडू, तर प्रॅक्टिसचा सचिन गायकवाड उत्कृष्ट खेळाडू ठरला.
------------
चौकट
फिजिओथेरपिस्टची नियुक्ती
स्पर्धेसाठी प्रथमच प्रत्येक संघासाठी फिजिओथेरपिस्टची नियुक्ती केली आहे. डॉ. ऋषिकेश पोळ प्रत्येक खेळाडूंची तपासणी करून अहवाल देत आहेत. तसेच काही घडल्यास तातडीने उपचार केले जात आहेत.
--------
आजचा सामना
बालगोपाल विरुद्ध बीजीएम