
फुटबॉल
लोगो राजेश चषक फुटबॉल स्पर्धा
91810
कोल्हापूर : राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत झुंझार क्लब विरुद्ध दिलबहार यांच्या सामन्यातील एक क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
‘झुंजार क्लब’कडून दिलबहार पराभूत
‘टायब्रेकर’वर ४ विरुद्ध ३ गोल; यशराज नलवडे दमदार खेळी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : राजेश चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत झुंजार क्लबने दिलबहार तालीम मंडळाला टायब्रेकरवर ४ विरुद्ध ३ गोल फरकाने पराभूत केले. झुंजारच्या खेळाडूंनी दमदार खेळ करत दिलबहारच्या खेळाडूंची कोंडी केली. अखेरच्या क्षणात मैदानात उतरलेल्या झुंजारच्या यशराज नलवडेने टायब्रेकरवर गोलची नोंद केलीच, शिवाय बदली गोलरक्षक म्हणून चेंडू अडवून विजयाचा मोलाचा वाटा उचलला. संयुक्त जुना बुधवार सेवाभावी संस्थेतर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
दिलबहार विरूद्ध झुंजार यांच्यातील सामन्यात दिलबहारचे पारडे जड ठरेल, असा प्रेक्षकांचा कयास होता. दिलबहारचे खेळाडू त्याच आविर्भावात मैदानावर खेळत होते. त्यांच्या पवन माळीने गोल करण्याच्या दोन सोप्या संधी दवडल्यानंतर झुंजारच्या खेळाडूंचा आत्मविश्वास हळूहळू वाढत गेला. पूर्वार्धात त्यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. ते दिलबहारच्या बचावफळीने हाणून पाडले. उत्तरार्धात झुंजारच्या खेळाडूंनी चढायांवर जोर दिला. त्यांच्या सुयश साळोखेने ४५ व्या मिनिटाला हेडद्वारे गोल केल्यानंतर दिलबहारच्या गोटात खळबळ उडाली. एक गोलची आघाडी घेतल्याने झुंजार खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला. दिलबहारच्या खेळाडूंनी गोलची परतफेड करण्यासाठी झुंजारच्या बचावफळी भेदण्यावर लक्ष केंद्रीत केले. दिलबहारकडून स्वयम साळोखे याने ४८ व्या मिनिटाला गोलची परतफेड केली. त्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गोल करण्यासाठी आटापिटा केला. दिलबहारच्या खेळाडूंना झुंजारचा गोलरक्षक अनिल जानकर याने दाद दिली नाही. त्याने उत्कृष्ट गोलक्षेत्ररक्षण केले. या वेळेत झुंजारकडून यशराज नलवडे मैदानात उतरला. त्याने टायब्रेकरवर गोल केला. तसेच बदली गोलरक्षक म्हणून चेंडू अडवला.
----------------
आजचा सामना
शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था, दुपारी ४ : ०० वाजता
---------------
टायब्रेकर असा
दिलबहार*झुंजार
पवन माळी - गोल*मसूद मुल्ला - गोल
सचिन पाटील - गोल*सुयश साळोखे - गोल
सनी सणगर - गोल*सूर्यप्रकाश सासने - गोल
स्वयम साळोखे - बाहेर* यशराज नलवडे - गोल
सुमित घाडगे - गोलरक्षकाने तटवला*-
------------
सामनावीर - अनिल जानकर (गोलरक्षक, झुंजार क्लब)
लढवय्या खेळाडू - रोहन दाभोळकर (दिलबहार तालीम मंडळ)