
बाजार समिती निवडणूक शिवसेना ठाकरे गट लढवणार.
ठाकरे गट निवडणूक लढवणार ः देवणे
कोल्हापूर, त २८ : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट पूर्ण क्षमतेने लढवणार आहे. महाविकास आघाडीमध्ये राहून या निवडणुकांना आम्ही सामोरे जाणार आहोत, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली.
कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लज बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. देवणे म्हणाले, जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महाविकास गाघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबई येथे नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबत निर्णय झाला. त्यानुसार बाजार समितीसह पुढील काळात सहकारात होणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकत्रित लढणार आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच सहकारमधील सत्तेपासून भाजपला रोखण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. शहरप्रमुख सुनील मोदी, प्रकाश पाटील सुरेश चौगले, राजू यादव, तानाजी आंग्रे, विनोद खोत, अनिल देसाई, डॉ. अनिल पाटील, राकेश चौगले उपस्थित होते.