
खंडोबा तालीम अंतिम फेरीत
लोगो - राजेश चषक फुटबॉल स्पर्धा
92539
कोल्हापूर : राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील सामना पाहण्यासाठी शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
92541
कोल्हापूर : राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्या सामन्यातील एक क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
खंडोबा तालीम अंतिम फेरीत
शिवाजी तरुण मंडळावर मात; इर्षेने खेळी करत दोन्ही संघांनी जिंकली प्रेक्षकांची मने
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : राजेश चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने शिवाजी तरुण मंडळावर टायब्रेकरवर ३ विरुद्ध १ गोलफरकाने विजय मिळवत अंतिम सामन्यात आज प्रवेश केला. दोन्ही संघांनी इर्षेने खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली. अखेरच्या क्षणांत गोल करत आघाडी घेण्याची किमया साधता आली नसली तरी टायब्रेकरवर खंडोबाचे खेळाडू भारी ठरले. संयुक्त जुना बुधवार सेवाभावी संस्थेतर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पूर्वार्धात खंडोबाच्या संकेत मेढे याने शिवाजीच्या मोठ्या डीमध्ये प्रवेश करत चेंडूस फटका लगावला. शिवाजीचा गोलरक्षक मयूरेश चौगुले याने पुढे येत चेंडू अडवून गोलचे संकट टाळले. खंडोबाच्या मायकल सेपने फ्री किकवर मारलेला चेंडू गोलरक्षक मयूरेशने हाताने अडवून पुढे ढकलला. खंडोबाच्या दिग्विजय आसनेकरने परतलेल्या चेंडूस गोलजाळीची दिशा दाखवत संघाच्या खात्यात पहिल्या गोलची नोंद केली. हा गोल तेराव्या मिनिटाला झाला. त्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी चढायांचा प्रयत्न केला. यावेळी खंडोबाला दोन तर शिवाजीला एक कॉर्नर किक मिळाली. त्याचा फायदा मात्र त्यांना उठवता आला नाही. शिवाजीच्या इंद्रजित चौगुले याने मोठ्या डी बाहेरुन मारलेला चेंडू गोल जाळीवरून गेला.
योगेश कदम याने मोठ्या डीत मिळालेल्या पासवर ४२ व्या मिनिटाला चेंडूस थेट गोलजाळीची दिशा दाखवली. या गोलने शिवाजीच्या समर्थकांनी जल्लोष केला. त्यानंतर लगेचच शिवाजीच्या इंद्रजित चौगुलेने चेंडू घेऊन खंडोबाच्या गोल जाळीच्या दिशेने चाल केली. त्याने गोलजाळीसमोर आलेल्या करण चव्हाण-बंदरे याला चेंडूचा पास दिला. तो चेंडूस फटका मारणार इतक्यात खंडोबाचा गोलरक्षक निखिल खन्ना याने चेंडू अडवला.
उत्तरार्धात ‘शिवाजी’च्या इंद्रजित चौगुले याने कॉर्नर किकवर मारलेला चेंडू ‘खंडोबा’च्या गोलखांबाला लागून मैदानाबाहेर गेला. या वेळेत शिवाजीच्या करणने खंडोबाच्या मोठ्या डीत चेंडू मिळूनही गोल करण्याची संधी दवडली. त्यानंतर खंडोबाच्या दर्शन पाटीलला शिवाजीच्या मोठ्या डीत चेंडू मिळाला. त्याने फटकावलेला चेंडू गोलरक्षक मयूरेशने तटवला. दर्शनला सोप्या संधीचा लाभ उठवता आला नाही. ‘खंडोबा’कडून संकेत मेढे,कुणाल दळवी यांनी चांगल्या खेळाचे दर्शन घडवले. दरम्यान सामन्याच्या मध्यंतरास अभिनेते खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मैदानावर येऊन प्रेक्षकांशी संवाद साधला. मैदानावर फेरी मारुन त्यांनी प्रेक्षकांसमवेत छायाचित्रे घेतली.
--------------------
टायब्रेकर असा
खंडोबा*शिवाजी
मायकल सेप - चेंडू गोलखांबाला लागला*सुमीत जाधव-बाहेर
प्रथमेश गावडे - चेंडू अडवला*रोहन आडनाईक - गोलजाळीवरुन
प्रभू पोवार - गोल*जय कामत - चेंडू तटवला
ऋतुराज संकपाळ - गोल*करण चव्हाण - गोल
संकेत मेढे - गोल*-
----------------
आजचा सामना : झुंजार क्लब विरुद्ध बीजीएम स्पोर्ट्स, वेळ - दुपारी ४ : ००
------------------
सामनावीर : प्रभू पोवार (खंडोबा तालीम)
लढवया खेळाडू : योगेश कदम (शिवाजी मंडळ)