मोर्चा

मोर्चा

92689
...

प्रकल्पग्रस्तांचा वनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा

उपवनसंरक्षकांना निवेदनः विविध मागण्यांसाठी प्रवेशद्वारावर ठिय्या

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ३१ : गेल्या पंधरा वर्षांतील २१५ हेक्टर जमिनीची अंतिम मंजुरी देऊन जमिनीचे वाटप करा, यासह अन्य मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे रमणमळा परिसरातील मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. २८७ हेक्टर जमिनीची पसंती घेतलेल्या प्रस्तावाचे काय झाले?, अशी विचारणा यावेळी करण्यात आली. उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचे तेहतीस दिवस आंदोलन सुरू आहे. दिवसांमागून दिवस उलटले जात असले तरी त्याची दखल घेतली जात नाही, असा आरोप प्रकल्पग्रस्त करत आहेत. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे शासन गांभीर्याने कधी पाहणार, अशी विचारणा करत आहेत. या प्रकल्पग्रस्तांनी आज थेट वनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ कार्यालय, रेसिडेन्सी क्लब मार्गे मुख्य वनसंरक्षक कार्यालय असा त्याचा मार्ग राहीला. येथे आल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी थेट प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. तनाळी, सोनार्ली, ढाकाळे गावांच्या संपादनातून चुकलेल्या जमिनीचे संपादन करावे, मोजणी झालेल्या ताली, घरे, फळझाडे यांच्याबाबत मूल्यांकन करून मोबदला द्यावा, घर बांधणीसाठी एक लाख ६१ हजार ४०० रुपयांचा प्रस्ताव करून निधी द्यावा, कागल तालुक्यातील निवले वसाहत येथील गावठाणाची जागा भूसंपादन करून गावठाण कायम करावे व मंजूर नागरी सुविधांची कामे सुरू करावीत, पिण्याचे पाणी द्यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी वनखात्याकडे साडेचार कोटी रूपये आले असून, येत्या सोमवारपासून (ता. ३) त्याचे वाटप केले जाईल, असे उपवनसंरक्षक गुरूप्रसाद यांनी सांगितल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मारूती पाटील यांनी स्पष्ट केले. मोर्चात नजीर चौगुले, आनंद आमकर, दाऊद पटेल, पांडुरंग कोठारी, शामराव कोठासे, जगन्नाथ कुडतूडकर, विनोद बडदे, मारुती धोंडी पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त सहभागी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com