राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुस्तक अनुवाद

राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुस्तक अनुवाद

0६५३१ - ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार

शाहूराजांच्या सामाजिक क्रांतीत
सामान्य माणूसच केंद्रबिंदू
डॉ. जयसिंगराव पवार; रशियन व इटालियन क्रांतीत तोच धागा

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : ‘‘रशियन राज्य क्रांतीने झारची जुलमी राजवट उलथवून टाकली. जोसेफ मॅझिनीने इटलीच्या स्वातंत्र्य लढ्यात वाहून घेतले. त्याने लंडनमध्ये इटालियन मुलांसाठी शाळा स्थापन करून, इटालियनांवर होणारा जुलूम थांबवला. फ्रेंच राज्य क्रांतीने सरंजामशाही मूल्य व्यवस्थेचा पगडा ओसरून परिवर्तन घडून आले. राजर्षी छत्रपती शाहूराजांनी कोल्हापूर संस्थानात उपेक्षित वर्गाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. ही त्यांनी केलेली ‘सामाजिक क्रांती’ होती. या सर्व क्रांतींचा बारकाईने अभ्यास केल्यास, त्या मागे सामान्य माणूस केंद्रबिंदू होता. शाहूराजांनी केलेले कायदे युरोपात त्या काळी अस्तित्वात नव्हते. त्यांच्या कार्याचे मूल्य रशियन व इटालियन लोकांपर्यंत पोचणे जरूरीचे असल्याने या दोन्ही भाषांत शाहू चरित्र अनुवादित केले आहे,’’ अशी माहिती ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज ‘सकाळ’ला दिली. ‘राजर्षी शाहू छत्रपती : एक समाज क्रांतिकारी राजा’ चरित्र ग्रंथांचे रशियन व इटालियन अनुवादाचे उद्या (ता. ६) प्रकाशन होत आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी शाहू कार्याचा नेमकेपणाने वेध घेतला.
डॉ. पवार म्हणाले, ‘‘इटली,‌ फ्रेंच, रशियातील राजकीय क्रांती सामान्य लोकांच्या हक्कासाठी होती. या क्रांतींमध्ये मानवमुक्तीच्या दिशेने लढे दिले गेले. शतकानुशतके पिळवणूक झालेल्या लोकांचा तो स्वातंत्र्यासाठी हुंकार होता. शाहूराजांनी कोल्हापूर संस्थानात सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला. त्यांनी स्वातंत्र्याचा संकुचित अर्थ घेतला नाही. सामाजिक न्याय, समता व बंधुतेवर आधारलेले राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांच्यासमोर काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचा प्रदेश होता. त्यांचे कार्य अन्य देशातील क्रांत्यांशी सुसंगत व पूरक आहे. ते शंभर वर्षे पुढे पाहणारे द्रष्टे राजे होते. सामाजिक कायद्यातून त्यांनी समतेचा जागर घातला.’’

ते म्हणाले, ‘‘त्यांनी ज्या योजना संस्थानात राबवल्या, त्या त्या काळात युरोपात अस्तित्वात नव्हत्या. त्यांचे कार्य तिथल्या लोकांना कळायला हवे. त्यांनी स्थापन केलेल्या वसतिगृहात माझा वैचारिक पिंड पोसला आहे. मी शाहू प्रॉडक्ट असून, ते विविध भाषांत पोचवणे माझी जबाबदारी आहे. त्यांचे विविध क्षेत्रांतील कार्य केवळ भारतापुरते मर्यादित नाही. देशादेशांत घडलेल्या परिवर्तनवादी चळवळींशी ते निगडित आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कार्याचे मोल जाणून घ्यायला हवे.’’

* डॉ. पवार म्हणतात...
- रशियन व इटलीतील लोकांनी शाहू चरित्र अभ्यासायला हवे
- सामान्य माणसाच्या अस्मिता जागे करणारे शाहूंचे कार्य
- शाहूंची दूरदृष्टी कशी होती, याची माहिती देणारा ग्रंथ
- समतेच्या पायावर आधारलेल्या क्रांती प्रेरणादायी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com