पीटीएमही मुख्य फेरीत दाखल

पीटीएमही मुख्य फेरीत दाखल

फोटो - १७६४
कोल्हापूर : शाहू छत्रपती गोल्ड चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

‘पीटीएम’ही मुख्य फेरीत दाखल
---
खंडोबा तालीम मंडळावर ३-१ ने मात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : शाहू गोल्ड कप वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळाने (अ) खंडोबा तालीम मंडळावर तीन विरुद्ध एक गोलफरकाने मात करीत ‌मुख्य फेरीत आज प्रवेश केला. ‘पाटाकडील’च्या खेळाडूंनी पूर्ण वेळेत अप्रतिम खेळ केला. खंडोबाच्या पुढच्या फळीत समन्वयाचा अभाव राहिल्याने त्यांच्या गोल करण्याच्या चांगल्या संधी‌ वाया गेल्या. कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनतर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे.
पाटाकडील विरुद्ध खंडोबा यांच्यातील सामना रंगतदार झाला. ‘खंडोबा’च्या खेळाडूंनी उत्तरार्धात चेंडूवर जादा वेळ नियंत्रण ठेवले असले, तरी ‘पाटाकडील’च्या खेळाडूंनी मिळालेल्या संधींचे सोने केले. ‘खंडोबा’च्या खेळाडूंना तशी किमया साधता आली नाही. सामन्याच्या पूर्वार्धात ‘पाटाकडील’च्या सोमाडी याने ओंकार मोरेच्या पासवर १२ व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर रोहित पवारने ऋषीकेश मेथे- पाटीलच्या पासवर १९ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. दोन गोलचे अंगावर ओझे झाल्याने ‘खंडोबा’च्या खेळाडूंनी लगेच आक्रमक चढाई केली. त्यात त्यांच्या संकेत मेढे याने २० व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर दिग्विजय आसनेकरच्या पासवर संकेतने हेडद्वारे मारलेला चेंडू ‘पाटाकडील’च्या गोलजाळीवरून गेला.
उत्तरार्धात ‘पाटाकडील’च्या ओंकार मोरेने फटकावलेला चेंडू ‘खंडोबा’च्या वरच्या गोल खांबाला लागून मैदानाबाहेर गेला. ‘खंडोबा’च्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण चढाया केल्या असल्या, तरी पुढच्या फळीत त्यांना समन्वय साधता आला नाही. दिशाहीन फटक्यांमुळे त्यांच्या संधी वाया गेल्या. ‘पाटाकडील’च्या ओंकार पाटीलच्या पासवर ओंकार मोरे याने ६६ मिनिटाला गोल करीत संघाला निर्णायक आघाडीवर नेले. ‘खंडोबा’कडून चिजोबा, संकेत, दिग्विजय, कुणाल दळवी, तर ‘पाटाकडील’कडून सोमाडी, ओंकार, सैफ हकीम, ओंकार यांनी चांगला खेळ केला.

* आजचा सामना :
- दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था, वेळ ः दुपारी ४.

पावसातही रंगला खेळ
सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना अचानक पावसाने हजेरी लावली. पावसाच्या धारा अंगावर झेलत खेळाडूंनी खेळ केला. चेंडूवर नियंत्रण मिळविताना त्यांचा कस लागत होता. पावसाची धार काही वेळ थांबली आणि पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com