व्याख्यानमाला

व्याख्यानमाला

शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला ... लोगो
06006
...

सावरकरांकडून धार्मिक द्वेषाची पेरणी

निरंजन टकले ःद्विराष्ट्र सिद्धांत मांडून जबाबदारी मात्र टाळली

कोल्हापूर, ता. ३० ः'' वि. दा. सावरकर यांनी धार्मिक द्वेषाची पेरणी केली असून, विज्ञानवादी म्हणवून घेताना त्यांनी ‘शुद्धी’ नावाचा यज्ञ कसा काय केला?,’ असा प्रश्‍न ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी आज येथे उपस्थित केला.
अखिल भारतीय मराठा महासंघ, राजर्षी शाहू सलोखा मंच व मराठा स्वराज्य भवनतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेत ते बोलत होते. त्यांनी ‘शिवचरित्र व विनायक सावरकर’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. निवृत्त पोलिस उपअधीक्षक विश्‍वास चौगुले अध्यक्षस्थानी होते. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
श्री. टकले म्हणाले, ‘सावरकर यांचा गांधी, मुस्लिम व कॉंग्रेसला विरोध होता. ते नेहरूंवरही टीका करत राहिले. इंग्रजांकडे निवृत्तीवेतन वाढवून मिळावे, यासाठी त्यांनी मागणी केली होती. त्यांना विज्ञानवादी म्हटले जात असताना त्यांनी कर्मकांड कसे काय जन्माला घातले? पतितपावन मंदिर कसे काय उभारले? अंदमानमध्ये असताना ते अन्य जाती-धर्माच्या लोकांसोबत जेवायला बसले. त्यात कोणते आले मोठेपण?’
ते म्हणाले, ‘बुद्धीभेद करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. तुरूंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी एक ओळ इंग्रजांविरोधात लिहिली नाही, की आंदोलन केले नाही. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सत्कारावेळी त्यांनी स्वत:चा उल्लेख वीर असा केला. अत्रेंनी तर त्यांना ‘वीरशत्रू’ असे म्हटले होते. त्यांनी केलेला पत्रव्यवहार इंग्रजांकडे आहे. द्विराष्ट्र सिद्धांत मांडून त्यांनी त्याची जबाबदारी मात्र स्वीकारली नाही.’
‘माझ्यावर आजोबांचे संस्कार झाले आहेत. माझ्या अंगात धर्मनिरपेक्ष, निर्भयता त्यांच्यामुळे आली आहे. सतत सत्य सांगण्याची हिंमत माझ्यात त्यामुळेच आहे. देशात खोटा इतिहास सांगून लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. हे रोखण्यासाठी लोकांनीच आता जागरूक होणे आवश्‍यक आहे’, असेही ते म्हणाले.
या प्रसंगी शैलजा भोसले, शशिकांत पाटील, सुशीलकुमार कोल्हटकर, अशोक भंडारी, दिलीप पाटील, सुनील पाटील उपस्थित होते. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
-------------

* आजचे व्याख्यान
- वक्ते - ज्येष्ठ विचारवंत रवींद्र पोखरकर (मुंबई)
- विषय - राजर्षी शाहू, इतिहासकार जॅक्सनचा खून आणि कोल्हापूर संबंध
- वेळ - सायंकाळी ५ : ३०
- स्थळ - राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com