कुस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुस्ती
कुस्ती

कुस्ती

sakal_logo
By

फोटो - ६६६७, ६६६८

ऑलिंपिकमध्ये कामगिरीसाठी पुढाकार घ्यावा

आमदार जयश्री जाधव; महापालिकेच्या शाहू केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : पैलवानांनी ऑलिंपिकमध्ये पदक मिळवावे, यासाठी जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी आज येथे केले. महापालिकेतर्फे खासबाग मैदानात आयोजित शाहू केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कोल्हापूर जिल्हा व शहर तालीम संघाच्या मान्यतेने स्पर्धेस आजपासून सुरुवात झाली. महिला व पुरुषांच्या गटात चटकदार लढती झाल्या. हलगी, घुमकं व कैताळच्या ठेक्याने लढतींत रंग भरला.
श्रीमती जाधव म्हणाल्या, ‘हेलसिंकी येथे खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिकमध्ये देशासाठी पहिले पदक मिळवले. तशी कामगिरी इथल्या पैलवानांना करता आली नाही. महाराष्ट्र राज्य त्यात मागे पडले. ही उणीव काढण्यासाठी तालीम संघाने पुढाकार घेणे आवश्‍यक आहे.’ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, ‘राजर्षी छत्रपती शाहू राजांनी कुस्तीला राजाश्रय दिला. अनेक नामांकित पैलवान या लाल मातीत तयार झाले. तो वारसा जोपासत पैलवानांनी कामगिरी करावी. त्यांच्या विजयाचे फलक सर्वत्र लागायला पाहिजेत. मातीतली कुस्तीची परंपरा टिकवत पैलवानांनी खेळीमेळीच्या वातावरणात पंच निर्णय देतील तो मान्य करावा.’ महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे म्हणाल्या, ‘कमी वेळेत कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा महिला गटाचा समावेश त्यात केला आहे. त्यातून महिला पैलवानांना प्रोत्साहन तर मिळेलच, शिवाय त्यांचे टॅलेंट मैदानात पाहण्याची संधी मिळेल.’
याप्रसंगी जिल्हा व शहर तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, अॅड. महादेव आडगुळे, हिंदकेसरी विनोद चौगले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, सुभाष जाधव, अशोक जाधव, पैलवान बाबा राजेमहाडिक, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, सहायक आयुक्त संजय सरनाईक, उप शहर अभियंता नारायण भोसले उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी सूत्रसंचालन केले.

००००

पहिल्या फेरीतील विजेते

- महिला गट- शिवानी मेटकर (खडकेवाडा), अपेक्षा पाटील (मूरगुड), सृष्टी भोसले (पिराचीवाडी), अमृता पुजारी‌ (शिरोळ),
वैष्णवी कदम (मसुचीवाडी), संस्कृती रेडेकर (भाचरवाडी), गौरी पाटील (वाघुर्डे), प्रमिला बागडी (सांगली), गौरी पाटील (मासा बेलेवाडी)

- पुरुष गट- राहुल फुलमाळी (बीड), शशिकांत बोंगार्डे (बानगे), तुषार ठोंबरे (सातारा), शुभम भोग (पुणे), स्वराज्य तामखेडे (सांगली)