
कुरुंदवाच्या २९ मिळकतधारकांना नोटीस
कुरुंदवाडच्या २९ मिळकतधारकांना नोटीस
धोकादायक घरे; अन्यथा पालिका मिळकती उतरवून घेणार
कुरुंदवाड, ता. ८ : पावसाळा व संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर शहरातील २९ धोकादायक घरे संबंधित मिळकतधारकांनी उतरवून घ्यावीत अन्यथा पालिका प्रशासन सदर मिळकती उतरवून घेईल, असा इशारा पालिकेने मिळकतधारकांना दिला आहे. शहरातील जुन्या दगड, वीट, मातीची काही घरे, जीर्ण झाली आहेत. काही इमारतीचा भाग धोकादायक बनला आहे. अशा मिळकतधारकांचा यात समावेश आहे.
नोटिसा लागू झालेल्या मिळकतधारकांपैकी अनेकांना पालिकेच्या घरकुल योजनेचा अद्याप लाभ न मिळाल्याने व त्यांची अन्यत्र राहण्याची सोय नसल्याने या मिळकतधारकांना ऐन पावसाळ्यात निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
२०१९ व २०२१ सालच्या महापुरात शहरात सहा फुटापेक्षा जादा पाणी आले होते. अनेक घरे जमीनदोस्त झाली, तर अनेक वर्षांपूर्वीच्या जुन्या दुमजली माडी, दगड-वीट-मातीची कौलारू घरे, पाण्यात भिजल्याने धोकादायक झाली आहेत. काही इमारतीच्या भिंती झुकल्या आहेत. काही नागरिक अशा धोकादायक घरांची स्वच्छता करून त्याठिकाणी वर्षभरापासून वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापुराच्या पाण्याने ढिसूळ झाल्याने भिंती व घरे कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे जीवितहानी, आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. या धोकादायक घरात नागरिकांनी वास्तव्य करू नये मिळकतधारकांनी ही घरे, घरांचा धोकादायक भाग तत्काळ उतरवून घ्यावा, असे नोटिशीत म्हटले आहे. अन्यथा पालिका प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासक मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिला आहे.
--------------
चौकट
धोकादायक घरांचा सर्वे
कुरुंदवाड शहरातील धोकादायक घरांचा सध्या सर्व्हे सुरू केला आहे. २९ हून अधिक धोकादायक घरे व इमारती निदर्शनास आल्या आहेत. त्यांना या इमारती तत्काळ उतरून घेण्याबाबत सांगितले आहे. अजून ही अशा काही धोकादायक इमारतीत नागरिक वास्तव करत आहेत. त्यांना तत्काळ घरे सोडण्याचा इशारा दिला असल्याचे नगर अभियंता नितीश कदम यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01834 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..