पावसाची बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाची बातमी
पावसाची बातमी

पावसाची बातमी

sakal_logo
By

४९६६९ फोटो मस्ट


३८५७ निळपण
१७१४ हेरे
१७८९ पिकांत पाणी

कृषी पंपांसह गवताची कुरणे बुडाली
फळपिकांसह, भाजीपाल्याला फटका; कृष्णा, पंचगंगेच्या पातळीत चार फुटांनी वाढ
कुरुंदवाड, ता. १२ ः दमदार पावसामुळे कृष्णा, पंचगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली असून, शिरोळ तालुक्यातील राजापूर, तेरवाड व शिरोळ हे दोन्ही बंधारे तिसऱ्यांदा पाण्याखाली गेलेत. नद्या पुन्हा पात्राबाहेर येऊ लागल्या आहेत. दरम्यान, फळपिकासह भाजीपाल्याला फटका बसल्याने भाव काहीसे वधारले.
तेरवाड बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पातळी ४४ फूट ३ इंच, तर शिरोळ बंधाऱ्याजवळ ३३ फूट झाली आहे. कृष्णा नदीची राजापूर बंधाऱ्याजवळ २३ फूट ३ इंच पातळी झाली आहे. राजापूर बंधाऱ्यातून ५० हजार ५०० क्युसेकने कर्नाटकडे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी २७ फूट ३ इंच आहे.
तेरवाड बंधारा परिसरात अचानक पातळी वाढल्याने काहींचे शेती पंप पाण्यात बुडाले आहेत. अचानक पातळीत वाढ झाल्याने गवताची कुरणे पाण्याखाली गेली. काही मच्छीमारांनी लावलेली माशांचे जाळेही पाण्यात अडकले आहेत. पावसाची रिपरिप सुरू असल्याने पंचगंगेच्या पातळीत रात्रीतून ४ फुटांनी वाढ झाली आहे. तेरवाड स्मशानभूमीजवळ पाणी आले आहे. कुरुंदवाड पालिकेने अनवडी नदी व गोठणपूर परिसरात पाहणी करून बॅरिकेड्‌स लावले आहेत.


राधानगरीत विसर्ग घटला
राधानगरी : तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. भोगावतीचे पाणी पात्राबाहेर पसरले असून, धरणाची पातळी स्थिर आहे. काळम्मावाडी धरणातून विसर्ग वाढवला आहे. सात स्वयंचलित दरवाजांपैकी तीन काल खुले झाले होते, पैकी एक आज बंद झाला. दोन दरवाजांतून २८५६ क्युसेक, तर वीजनिर्मितीसाठी सोळाशे असे एकूण ४४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. आजही तालुक्यात मुसळधार कायम असून, सकाळपर्यंतच्या २४ तासांत ७७ मिमी तर सकाळपासून दहा तासांत ६२ मिमी पाऊस झाला. काळम्मावाडी क्षेत्रात १०५ मिमी पाऊस झाला. दिवसभरात २४ मिमी पाऊस झाला असून, १४०० क्युसेक विसर्ग आहे. हे धरण ८८ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रातून आवक अधिक झाल्यास आणखी स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे.

चांदोलीतून विसर्ग बंद
तुरुकवाडी : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरूच असून, शाहूवाडीत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात गेले तीन दिवसांपासून संततधार सुरू आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात २४ तासांत ८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाणी पातळी ७५१ मीटरपर्यंत पोहोचली आहे. पाणलोट क्षेत्रातून १५७३ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरण शंभर टक्के भरण्यासाठी निव्वळ एक टीएमसी पाणी आवश्यक आहे. धरणातून होणार विसर्ग पूर्णतः रोखला आहे. कानसा, कडवी, वारणा नदींची पातळी झपाट्याने वाढत आहे.

तुळशी परिसरात जोर कमी
धामोड : येथील तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पावसाचा जोर कमी झाला. एका वक्र दरवाजातून ५०० क्युसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. २४ तासांत येथे ३७ मिमी. पावसाची नोंद झाली असून, आजअखेर धरण क्षेत्रात ३२३६ मिमी. पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने धरणातून ८०० क्युसेकने विसर्ग सुरू होता. दरम्यान, आज धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग ५०० क्युसेक केला. केळोशीतील लोंढा नाला प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग तुळशी धरणात येत आहे.

गडहिंग्लजला संततधार;
बंधारे पाण्याखालीच
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरासह तालुक्यात आजही संततधार कायम राहिली. काल रात्री पावसाने विश्रांती घेतल्याने आज सकाळी नदीतील पाण्याची पातळी अर्ध्या फुटाने कमी झाली होती. मात्र, आजच्या पावसामुळे या पातळीत सायंकाळपर्यंत काहीशी वाढ झाली. दरम्यान, निलजी, ऐनापूर व गोटूर बंधारे अद्याप पाण्याखालीच असून, अखंड संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे काही ठिकाणी घरांची अंशत: पडझड झाली आहे. सोयाबीन पिकात पाणी साठले असून, ते बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. भाजीपाला पिकालाही या पावसाचा फटका बसला आहे. टोमॅटो, दोडका, वांगी, बिन्स, दिडगा, मेथी, शेपू, लालभाजी आदी स्थानिक फळ व पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे बाजारात भाज्यांची आवक आज कमी राहिली. परिणामी भाव कडाडले होते.


बंधारे पाण्याखाली
कोनवडे ः भुदरगड तालुक्यातील कूर, मिणचे, हेदवडेसह परिसराला पावसाने झोडपून काढले. वेदगंगा नदीचे पात्राबाहेर पडले असून निळपण, म्हसवे, आकुर्डे बंधारे पाण्याखाली गेले. भात शेती पाण्याखाली गेली आहे. पावसाने अक्षरशः परिसराला झोडपून काढले आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. रात्री उशिरा पाऊस सुरूच होता.


ताम्रपर्णी पुलावर तिसऱ्यांदा पाणी
चंदगड ः तालुक्यात आज दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला. येथील ताम्रपर्णी पुलावर यावर्षी तिसऱ्यांदा पाणी आले. त्यामुळे हेरे, तिलारीनगरकडे जाणारा मार्ग बंद झाला. हेरे-मोटणवाडी मार्गावर हेरे नजीकचा पूलही पाण्याखाली गेला. ताम्रपर्णी व घटप्रभा नदींचे पाणी पात्राबाहेरून वाहात आहे. राहून राहून जोरदार सरी कोसळत आहेत. ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतवडीत पाणी साचले आहे. नदीकाठच्या पिकांना पुन्हा धोका निर्माण झाला आहे. राहून राहून पाऊस कोसळत असल्याने पाणी ओसरण्यास अवधी मिळत आहे. अनेक बंधाऱ्यांच्या काठोकाठ पाणी वाहत आहे, मात्र रात्रभर पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उद्यापर्यंत काही बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

४९७१२
कोवाड बाजारपेठेत धास्ती
कोवाड ः पावसाचा जोर वाढल्याने ताम्रपर्णीचे पाणी पात्राबाहेर पडले. आज सकाळी कोवाड बंधारा पाण्याखाली गेला. नदीकाठच्या दुकानदारांनी कालपासूनच माल बाहेर काढण्याला सुरवात केली होती. वेळीच माल बाहेर काढल्याने धोका ठळला. नदीच्या पाणी पातळी दिवसभरात जवळपास दोन फुटांनी वाढली. असाच पाऊस सुरू राहिल्यास मंगळवारी कोवाड बाजारपेठेत पाणी येण्याची शक्यता आहे. जुना बंधारा पाण्याखाली गेल्याने महसूल विभागाने बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्यांना मज्जाव केला होता.

सोयाबीन-भुईमूग पिके धोक्यात
बोरपाडळे : बोरपाडळेसह मोहरे, शहापूर, माले, काखे, आंबवडे, मिठारवाडी आदी परिसरात तीन दिवसांपासून संततधार सुरू आहे. हवामानातील गारठा पिकांना नुकसानकारक ठरत आहे. सोयाबीन, भुईमुगासह इतर पिकात पाणी साचून राहिल्याने पिके धोक्यात आल्याचे चित्र आहे. सऱ्या तुंबल्याने आडसाल ऊसलावण उगवणीत अडचण येत आहे. संततधार पावसामुळे काढणीस येणाऱ्या सोयाबीन, भुईमूग पिकाबाबत चिंता व्यक्त होत आहे. सऱ्या भरल्याने भुईमूग सोयाबीन पिकांना गारठा बाधणार आहे.

भोगावतीत पूरसदृश स्थिती
राशिवडे बुद्रुक, : भोगावती नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पाणी पात्राबाहेर शिवारात पसरले आहे. त्यामुळे काठावरील पिके पुन्हा पाण्याखाली गेली आहेत. पसरलेल्या पाण्याखाली असलेल्या भात पिकांचे मात्र यावेळी निश्चित नुकसान होण्याची शक्यता आहे. यासह हे पाणी दीर्घकाळ कायम राहिल्यास ऊस पिकालाही फटका बसणार आहे.

गगनबावड्यात तिसऱ्या दिवशी संततधार
असळज : गगनबावडा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार कायम राहिली. शेणवडे बंधारा पाण्याखाली गेला आहे. संततधार पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होणार आहे. २४ तासांत येथील कुंभी धरण क्षेत्रात १४८ मिलिमीटर, तर कोदे धरण क्षेत्रात १०७ मिलिमीटर पाऊस पडला. कुंभी धरणातून ७०० क्युसेक्स, तर कोदे धरणातून ५९७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुंभी, धामणी, सरस्वती व रुपणी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

१६५८
वेदगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर
नानीबाई चिखली ः वेदगंगा नदी यंदा तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडली. नानीबाई चिखली, बस्तवडे, सुरूपली कुरणी बंधारे पाण्याखाली आहेत. पाटगाव (ता. भुदरगड) येथील मौनीसागर जलाशय भरल्याने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाणी पातळी क्षणाक्षणाला वाढत आहे. नदी काठावरील पिके पाण्याखाली जात असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. पूरग्रस्त भागातील कुटुंबीयांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01919 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..