३५ वरून ११०० विद्यार्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३५ वरून ११०० विद्यार्थी
३५ वरून ११०० विद्यार्थी

३५ वरून ११०० विद्यार्थी

sakal_logo
By

03063
---------
३५ वरून ११०० विद्यार्थी
कुरुंदवाडमधील शाळा क्रमांक तीन; पटसंख्येत राज्यात अव्वल
अनिल केरीपाळे ः सकाळ वृत्तसेवा
कुरुंदवाड, ता. ११ ः एकीकडे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्येबाबत चिंताजनक स्थिती असताना येथील शाळा क्रमांक तीनमधील शिक्षकांनी जिद्द, चिकाटी व नियोजनबद्ध व्यवस्थापनाच्या जोरावर केवळ ३५ पटसंख्येवर आलेली शाळा ११०० पटावर नेली आहे. पटसंख्येबाबत राज्यात अव्वल स्थान पटकावले.
ही किमया एखाद-दुसऱ्‍या वर्षात झाली नाही, तर यामागे येथील शिक्षकांच्या सामुदायिक प्रयत्नांची एक तपाची तपश्चर्या आहे. गोंधळी, कोरवी व गोठणपुरातील जेमतेम ३५ विद्यार्थी व त्यांच्यासाठी दोन शिक्षक असे २००७-२००८ ची स्थिती असलेल्या या शाळेत आज ११०० विद्यार्थी, जिल्हा परिषदेचे ३५ शिक्षक व १० सेवाभावी शिक्षक असा ४५ जणांचा चमू विद्यार्थी घडवतोय.
२००५ पर्यंत ही शाळा दंगेखोर टवाळकी करणाऱ्‍या सर्रास शिवीगाळ करणाऱ्‍या विद्यार्थ्यांची शाळा अशी ओळख. २००७ मध्ये शिक्षक नेते रविकुमार पाटील यांची मुख्याध्यापक म्हणून बदली झाली. त्यांनी शाळा पुन्हा उभी करण्याचा संकल्प हाती घेतला व सहकारी दोन शिक्षकांना सोबत घेत टप्प्याटप्प्याने समाजाचा सहभाग वाढवत शाळेबाबत समाजात आश्वासक वातावरण तयार केले. शिक्षक सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत झोकून देऊन काम करतात. त्यामुळे पाहता-पाहता शाळेचा पट हजारावर कधी गेला, ते समजलेच नाही.
याबाबत मुख्याध्यापक पाटील म्हणाले, की मी येथे आलो, तेव्हा ३५ मुले होती. आज ११०० पट आहे. शिक्षकांनी मनात आणले तर काय होऊ शकते, याचे उदाहरण आहे. शाळेविषयी सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाबरोबर संवाद साधला. समाजानेही विश्वास ठेवला, त्यामुळेच हे शक्य झाले.
------------
अपुऱ्या भौतिक सुविधा
शाळेत ११०० विद्यार्थी सामावणे अत्यंत कठीण. वर्गखोल्यांसह भौतिक सुविधांची वानवा, तरीही ३५ खोल्यांमध्ये (त्यापैकी शिक्षकांनी १० खोल्या बांधल्या) संगणक कक्ष व मिळेल त्या जागेत विद्यार्थी बसतात. शाळेला स्वतंत्र क्रीडांगण नाही. प्रयोगशाळा, स्टाफ रूम नाही, तरीही शिक्षक तळमळीने काम करीत आहेत.