
प्रस्तावित करवाढ विरोधात सर्वपक्षीय बैठक
करवाढी रद्दसाठी आज कुरुंदवाडला निदर्शने
कुरुंदवाड ता. १९ ः महापूर, कोरोना, परतीचा पाऊस यामुळे शहरातील नागरिक आर्थिकदृष्ट्या संकटात असून समाजातील सर्वच घटकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशा स्थितीत पालिकेने केलेली प्रस्तावित करवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (ता. २१) पालिकेसमोर निदर्शने करून हरकती दाखल करण्यात येणार आहेत. मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सर्वपक्षीय बैठकीत केले. वृंदावन मंगल कार्यालयात चतुर्थ वार्षिक करवाढ विरोधात सर्वपक्षीय नेते, नागरिक, व्यापाऱ्यांची जागृती बैठक झाली. माजी नगरसेवक विलास उगळे म्हणाले, ‘अन्यायी करवाढ रद्दसाठी सर्वपक्षीय मंडळी एकत्रित आली. अधिकाधिक हरकती दाखल कराव्यात.’ आर. आर. पाटील म्हणाले, ‘गनंजय नगरातील अडिचशे मिळकतींना महसूल विभागाचा आणि पालिकेचा असा दुहेरी कर लागू होत आहे. याबाबत निर्णय पालिकेने घ्यावा.’ यावेळी बंडू उमडाळे,आप्पासाहेब बंडगर,सुनील कुरुंदवाडे, आण्णासाहेब चौगुले,अभिजित पाटील आदींनी मनोगते केली. सिकंदर सारवान,अभय पाटूकले, शैलेश व्होरा, बाबूलाल पवार,आण्णाप्पा बागडी, राजेंद्र फल्ले, संतोष शहा, महंमद हुसेन अथणीकर, दिलावर बागवान, राजेंद्र देवकाते, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने होते.