विनापरवाना डिजिटल फलकाविरोधात कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनापरवाना डिजिटल फलकाविरोधात कारवाई
विनापरवाना डिजिटल फलकाविरोधात कारवाई

विनापरवाना डिजिटल फलकाविरोधात कारवाई

sakal_logo
By

कुरुंदवाडमध्ये विनापरवाना
६२ डिजिटल फलक जप्त

कुरुंदवाड ता. १०ः पालिका व खासगी जागेत विनापरवाना उभारलेल्या डिजिटल फलकांविरोधात पालिकेने जोरदार मोहीम राबवत शहरातील ६२ फलक जप्त केले. प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या आदेशाने ही मोहीम सुरू आहे.
शहरात काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांवर जाहिरातीचे अनेक फलक विनापरवाना उभारले जात आहेत. राजकीय पक्ष, संघटना यांचे बॅनर, झेंडे अन्य फलक, जाहिरात कंपन्यांचे फलक तसेच अनेक व्यावसायिक, दुकानदार यांनी आपल्या व्यवसायाच्या दर्शनी बाजूस पालिकेच्या परवानगीशिवाय आणि कोणतेही जाहिरात शुल्क न भरता जाहिरात फलक उभारले आहेत. या विनापरवाना फलकांच्या गर्दीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे, अशा फलकांवर कारवाई करावी, असे आदेश मुख्याधिकारी चौहान यांनी मालमत्ता विभागाला दिले आहेत.
शहरात रस्ते निरीक्षक राजेंद्र गोरे, अमोल कांबळे, अभिजित कांबळे यांच्या पथकाने पालिका चौक, दर्गा चौक, सन्मित्र चौक, महाराणा प्रताप चौक, माळभाग, बाजारपेठ व कापड मार्केट परिसरातील विनापरवाना व जाहिरात शुल्क न भरता उभारलेले ६२ फलक जप्त केले. रितसर परवाना घ्यावा व जाहिरात शुल्क पालिकेकडे भरावे; अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. अमृत लाड, शशिकांत कडाळे, अजित दीपंकर, रिजवान मतवाल, विनोद दळवी यांनी कारवाईत सहभाग घेतला.