कुरुंदवाड नळ योजनेच्या गटांगळ्या

कुरुंदवाड नळ योजनेच्या गटांगळ्या

03426
१) कुरुंदवाड ः शिवशंकर वसाहतीमधील नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे.
03427
२) भैरेवाडी येथील पाण्याची टाकीदेखील अपूर्ण अवस्थेतच आहे.
03428
३) नृसिंहवाडी येथील उपसा केंद्राची विहीर आताच कलली आहे.
----------
बिग स्टोरी

कुरुंदवाड नळ योजनेच्या गटांगळ्या

कुरुंदवाड शहराच्या १४ कोटींच्या सुधारित नळपाणीपुरवठा योजनेचे काम साडेतीन वर्षांपासून बंद आहे. ही योजना कंत्राटदार निवडीपासूनच गटांगळ्या खात होती. चार वर्षांत केवळ १५ टक्के काम पूर्ण होऊन काम ठप्प झाले आहे. अनेक वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही ठेकेदाराने काम सुरू न केल्याने पालिकेने ठेकेदाराकडून काम काढून घेतले आहे. योजना सुरू करण्यासाठी चार दिवसांत बैठक लावण्याचे आश्वासन विद्यमान आमदार व खासदारांनी दिले; मात्र चार महिने झाले अजूनही बैठकीचा पत्ता नाही. त्यातच सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने आजी-माजी लोकप्रतिनिधीही चिडीचूप आहेत. प्रशासक तथा मुख्याधिकारी वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्‍या आदेशाची वाट पाहत आहेत. त्यामुळे तूर्त तरी योजनेचे भवितव्य अनिश्चिततेच्या भोवऱ्‍यात सापडले आहे….

-अनिल केरीपाळे
------
शहरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. थेट नळालाच विद्युत मोटारी लावल्याने अनेक भागांत पाणीच पोहचत नाही अशा तक्रारी आहेत. महिलांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत असून पाणीपुरवठा योजना व विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असून महिलांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे चित्र आहे.
कुरुंदवाड संस्थानकालीन गाव. संस्थानकाळापासून शहराला कृष्णा पंचगंगा घाटावरून पाणीपुरवठा होतो. १९३७ पासून इंजिनने नदीतील पाणी उचलून शहराला पुरवले जात होते. लोकसंख्येत वाढ व शहराचा विस्तार वाढू लागल्याने १९७२ मध्ये शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाणीपुरवठ्याची व्यवस्था सोपवली. त्यावेळी जलशुद्धीकरण केंद्रासह नवी पाणीपुरवठा योजना १९७६ मध्ये कार्यान्वित झाली. कृष्णा घाटावरच त्यासाठी यंत्रणा बसवली. १९९९ पासून पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरऐवजी क्लोरिन गॅसचा वापर सुरू झाला. दरम्यान, जुनी योजना कालबाह्य झाली. पूर्वीच्या तुलनेत या वाहिन्यांना नळ जोडण्यांची संख्या वाढल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला. दाब वाढवल्यानंतर गळती (लिकेज) वाढत आहे. दलित वस्तीसह जलवाहिन्या फुटल्याने गटाराचे पाणी मिसळू लागले. दुर्गंधी सुटून पाण्यात अळ्या दिसू लागल्या. वाढत्या विस्ताराने नव्या नळपाणीपुरवठा योजनेची गरज निर्माण झाली. त्यासाठी शहर शिवसेनेतर्फे सर्वप्रथम २०‌११ मध्ये पालिकेवर पहिला मोर्चा निघाला.

-------
शहर नळपाणीपुरवठा योजना (जुनी) दृष्टिक्षेप
लोकसंख्या :२८०००
मिळकतधारक : ७०००
नळपाणीपुरवठाधारक : ४०००
मीटरधारक : १३६८
बिगर मीटरधारक : २६३२
दैनंदिन पाणी उपसा : २० लाख लिटर्स प्रति माणसी ९० लिटरप्रमाणे
पाणी वितरण : दररोज दोन वेळा
कर्मचारी संख्या : १५
पाणीपट्टी वसूल : ६५ लाख
वसुलीची टक्केवारी : ७७ टक्के
---------------
नवी योजना वैशिष्ट्ये
उपसा केंद्र : नृसिंहवाडी कृष्णा पात्र (ओतवाडी)
दैनंदिन पाणी उपसा : ६० लाख लिटर्स
प्रति माणसी पाणी : १३५ लिटर्स
इंटक वेल, इस्पेक्शन वेल व जॅकवेलमधून पाईपलाईन ३०० मिमी पाईपातून पाणी जलशुद्धीकरण केंद्रात येणार. मटण मार्केटनजीक जलशुद्धीकरण केंद्रात येऊन तेथून जुन्या चार जलकुंभ व नव्याने शिवशंकर वसाहत दलित वस्ती व भैरेवाडी येथे नव्याने जलकुंभ उभारून शहरात नव्या जलवाहिन्या टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार.
--------
*शिवसेनेची ३२ आंदोलने*
२०११ मध्ये शिवसेनेने पाणीपुरवठा योजनेसाठी पहिला मोर्चा काढला. शहराला शुद्ध व मुबलक पाणी मिळावे यासाठी आक्रमक भूमिका घेतली. विशेष करून तत्कालिन शहरप्रमुख राजू आवळे सहकाऱ्‍यांना सोबत घेऊन सतत संघर्ष करताना दिसतात. पालिका लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेनेने कधी महिलांचा घागर मोर्चा, मुख्याधिकारी यांना घेराव, पालिकेवर गाढव मोर्चा, शंखध्वनी, होमहवन केले. ३२ वेळा आंदोलन छेडले. शहराचा पाणीपुरवठा पूर्ण होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, आंदोलन करणारच, असे प्रमुख आंदोलक राजू आवळे यांनी सांगितले.
--------
*कोट्यवधींचा निधी तरीही...
सुधारित नळपाणीपुरवठा योजनेसाठी १३ कोटींचा घसघशीत निधी मंजूर झाला असून त्यापोटी सहा कोटींचा निधी पहिला टप्पा म्हणून मिळाला. प्रत्यक्षात २०१६ मध्ये काम सुरू झाले; मात्र कामाची गती इतकी संथ की, चार वर्षांत केवळ १५ टक्केच काम झाले. दरम्यानच्या काळात पालिका सभेत याबाबत वादळी चर्चा होत होती. आरोप-प्रत्यारोप होत होते; मात्र कामात फारशी प्रगती झालीच नाही. जनभावना तीव्र झाल्यानंतर अखेर २०२० मध्ये पालिका सभेत नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी चर्चा करून ठेका काढून घेण्याची घोषणा केली. कोट्यवधींचा निधी मिळूनही योजना पूर्णत्वास गेली नाही.

* आमदार, खासदारांची आश्वासने हवेतच *
शहराच्या रखडलेल्या नळपाणीपुरवठा योजनेबाबत ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. याकडे नागरिकांनी आमदार, खासदारांचे लक्ष वेधले. चार महिन्यांपूर्वी खासदार धैर्यशील माने यांनी आढावा बैठकीत शहर नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी चार दिवसांत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर यड्रावकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत असेच आश्वासन दिले; मात्र याबाबत ना बैठक झाली ना निर्णय. त्यामुळे आमदार, खासदारांची आश्वासने हवेतच विरली आहेत.

*चार वर्षात १५ टक्केच काम*
२०१६ पासून अत्यंत संथगतीने काम करून चार वर्षांत केवळ १५ टक्केच काम संबंधित ठेकेदाराने केले. पालिकेने या प्रश्नावर ४४ वेळा बैठका लावल्या; पण ठेकेदाराने तब्बल ३५ बैठकांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. ९ बैठकांना प्रतिनिधी पाठवला. पालिकेच्या ५६ नोटिसांना उत्तरे दिली, तर काही नोटिसांना केराची टोपली दाखवली. तरीही सहानुभूती दाखवत दोन वेळा सहा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली; मात्र काम ठप्पच होते. अखेर जनक्षोभाचा विचार करून जानेवारी २०२० मध्ये पालिकेने सर्वसाधारण सभेत ठेका काढून घेण्याचा निर्णय घेतला.

*एकाही उपांगाचे काम पूर्ण नाही
नळपाणीपुरवठा योजनेचे एकूण १८ उपांग असून ठेकेदाराने चार वर्षांत एकाही उपांगाचे काम पूर्ण केलेले नाही. उपसा केंद्रावरील इंटक वेलचे काम ५२.०३ टक्के, इन्स्पेक्शन वेलचे ५८ टक्के, तर कनेक्टिंग पाइपचे काम १४ टक्के, जॅकवेल व पंप हाऊसचे काम ५३ टक्के व अशुद्ध जल रायझिंग मेनचे काम ३० टक्के झाले आहे. भैरेवाडी जलकुंभ ७० टक्के, शिवशक्ती नगर जलकुंभ ५८ टक्के इतकीच काय ती कामाची प्रगती असून तीही अर्धवट अवस्थेतच. उर्वरित उपांगाचा पत्ताच नाही. जलशुद्धीकरण केंद्रासाठी खोदाई केली. परत ती बुजवली. इतके काम अपुरे असताना केवळ जलवाहिनी टाकून एकूण कामाची टक्केवारी वाढवून दाखवण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून झाला आहे.

* जलशुद्धीकरण केंद्राच्या खड्ड्यात एकाचा बळी
येथील मटण मार्केटनजीक जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करण्यासाठी २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात खोदाई केली. पावसाच्या पाण्यामुळे खड्डा पाण्याने तुडुंब भरला. २७ जुलै २०१९ रोजी या खड्ड्यात सिकंदर हसन मणेर (वय ७०) हा वृध्द पडला व त्याचा बळी गेला. त्यापूर्वीही ९ जून २०१९ मध्ये एक शाळकरी मुलगा या पाण्यात पडला; मात्र सुदैवाने त्याला वाचवण्यात यश आले.

*नळपाणीपुरवठ्याचे तीन तेरा
शहराची सध्याची नळपाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली असून शहरातील सर्वच भागात कमी दाबाने, अपुरे पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. पालिकेच्यावतीने दिवसभरात दोन वेळा नळांना पाणी सोडण्यात येते; मात्र प्रत्यक्षात नळाला अपुरे व कमी दाबाने पाणी येते. त्यातच कुणीतरी मोटारी लावल्या की, पाणी गायब अशी स्थिती आहे. कशाबशा दहा ते बारा घागरी भरल्या की, झालं पाणी गेलंच अशी स्थिती असून दोन वेळा नको, एकदाच पाणी सोडा; पण पुरेशा प्रमाणात अशी महिलांची मागणी आहे.
---------
प्रतिक्रिया
०३४४६
नळाला एकदम बारीक पाणी येते व दहा मिनिटांत गायब होते. ८ ते १० घागरी पाणी मिळते. १८०० रुपये पाणीपट्टी मात्र न चुकता भरावी लागते. पालिकेकडे तक्रार करून दमलो. आता नादच सोडला. नवीन पाणीपुरवठा योजना एकदाची सुरू करा व महिलांची पाण्याच्या कटकटीतून सुटका करा.
-विजया भोसले, माळभाग, घारे गल्ली.
--------
03445
नदीत भरपूर पाणी; मात्र चावीला बारीक पाणी. सुरुवातीला जोरात येते; मात्र कुणीतरी मोटार चालू केली की, लगेचच जाते. तक्रार केलीच तर तुम्हीपण तक्रार करा, म्हणतात. बायकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. एकदाचा नवीन पाणीपुरवठा सुरू करा.
-सुरेखा पवार
----------
03447
पंधरा वर्षांपूर्वी नळ कनेक्शन घेतले. पाण्याचा थेंब नाही. पाणी येत नाही म्हणून मोटार लावली, तर तीन वेळा मोटार जप्त केली. पाण्यासाठी तक्रारी केल्या; पण दाद घेतली नाही. आता महिन्याला ९०० रुपये देऊन पेयजलचे पाणी विकत घ्यावे लागते. वैतागून पालिकेचे कनेक्शन कट करून टाकले.
-सुशिला माणगावे, भैरेवाडी
---------
03450
२००६ मध्ये कनेक्शन घेतले. मोटार लावूनही पाणी येत नाही. दहा फूट खोल खड्डा काढूनही पाणी मिळत नाही. तक्रार केली तर एक दिवस पाणी सोडतात. पुन्हा येरे माझ्या मागल्या... नवीन योजना होणार असे चार वर्षांपासून ऐकतो; पण अजून कशालाच कशाचा पत्ता नाही. पाण्यासाठी दुसरीकडं फिरावं लागतंय.
-शुभांगी बेले, भैरेवाडी
-------------
03449
पाच वर्षांपासून नळाला एक थेंब पाणी नाही. पालिकेकडे पैसे भरलेत. १८०० रुपये पाणीपट्टी भरली; पण पाणीच मिळत नाही. पाणी नाही तर कनेक्शन कशाला दिले? तक्रार कुणाकडं करायची? बोअर मारला व पिण्यासाठी पेयजलचा आधार पण आर्थिक भुर्दंड सोसायचा किती? नगरसेवकांना सांगितलं; पण ऐकणार कोण असा प्रश्न आहे.
- शीला बलवान, भैरेवाडी
--------------
03451
योजना मंजूर झाली २०१५ मध्ये, २०१६ मध्ये काम सुरू झाले. दोन वर्षांत काम पूर्ण करण्याची मुदत होती; मात्र १५ टक्केच काम झाले. आता याची जबाबदारी कोण घेणार? नळपाणीपुरवठा योजनेचा खेळखंडोबा करून टाकला. जनता निश्चितच जाब विचारणार.
-भाग्यश्री आडसूळ
---------
03453
शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी शिवसेनेतर्फे सतत आंदोलने केली. त्यानंतर शहराची सुधारित नळपाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मात्र अद्यापही योजनेचे केवळ १५ टक्केच काम झालेले आहे. दोन वर्षात पूर्ण करायचे काम आठ वर्षे झाली तरी पूर्ण होत नाही. याला लोकप्रतिनिधी व प्रशासन जबाबदार आहे. आता ही योजना शासनानेच ताब्यात घ्यावी अन्यथा ती पूर्ण होणार नाही. आणखी थोडे दिवस वाट पाहणार पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार. नळपाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
-राजू आवळे, माजी शहरप्रमुख शिवसेना (ठाकरे गट)
----------
03455
शहराच्या नळपाणीपुरवठा योजनेचे काम सध्या बंद आहे. ठेकेदाराचा ठेका रद्द केला आहे. काही बाबी न्यायप्रविष्ट आहेत. योजना २०१५ मध्ये मंजूर झाली. सात आठ वर्षात सर्वच साहित्याचे दर वाढलेत. त्यामुळे आता नव्याने काम करण्यासाठी निधी अपुरा पडणार आहे. त्यामुळे शासनाकडे वाढीव निधीकरिता परिपूर्ण प्रस्ताव सादर करणार आहे. त्यास मंजूरी मिळाल्यानंतरच नळपाणीपुरवठा योजनेचे काम सुरु होवू शकेल. शिवाय बाब न्यायप्रविष्ट असून न्यायालय व शासन निर्णय काय होतो यावरच नळपाणीपुरवठा योजनेचे काम नेमके कधी सुरु होईल हे अवलंबून आहे.
-आशिष चौहान, प्रशासक तथा मुख्याधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com