कुरुंदवाडला मिळकतींवर ९ टक्के कर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरुंदवाडला मिळकतींवर ९ टक्के कर
कुरुंदवाडला मिळकतींवर ९ टक्के कर

कुरुंदवाडला मिळकतींवर ९ टक्के कर

sakal_logo
By

03500
कुरुंदवाड पालिका इमारत
-----------
कुरुंदवाडला मिळकतींवर ९ टक्के कर
चतुर्थ वार्षिक कर आकारणी अपिलीय समितीकडून जाहीर
कुरुंदवाड, ता. १६ ः चतुर्थ वार्षिक कर आकारणी अंतर्गत शहरातील मिळकतीवर ९ टक्के कर आकारणीचा निर्णय चतुर्थ वार्षिक कर आकारणी अपिलीय समितीने जाहीर केला आहे. कोरोना व महापूर या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मिळकतधारकांच्या भावना विचारात घेत सहानुभूतीपूर्वक विचार करून समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी दिली.
दरम्यान सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून करवाढ कमी करण्यासंदर्भात लढा उभारला होता. आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नातून आणि पालिका प्रशासनाच्या सहकार्याने शहराची वाढीव कर आकारणीत सवलत मिळून ९ टक्के लागू झाल्याने लढा यशस्वी झाल्याचे कृती समितीचे अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांनी सांगितले.
पालिकेने चतुर्थ वार्षिक कर आकारणी अंतर्गत सुरुवातीला २० टक्के कर आकारणीच्या नोटिसा लागू केल्या होत्या. मात्र शहरातील मिळकतधारकांसह सर्वपक्षीय कृती समितीने यास हरकत घेतली. महापूर आणि कोरोनामुळे शहरवासियांचे आर्थिक कंबरडे मोडले असून त्यामुळे कर माफी करावी अशी मागणी केली होती. २ हजार ७४२ मिळकतधारकांनी कर मान्य नसल्याच्या हरकती दाखल केल्या होत्या. यावर चतुर्थ वार्षिक कर आकारणी समितीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, नगररचना अधिकारी प्रमोद गावंडे, मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी सुनावणी घेतली. हरकतींचा विचार करुन ५ टक्के कमी करून १५ टक्के कर आकारणी करत असल्याची घोषणा केली होती. मात्र प्रशासनाच्या १५ टक्के कर आकारणीच्या निर्णयाला सर्वपक्षीय कृती समिती आणि नागरिकांनी विरोध केला. पुन्हा अपिलीय समिती समोर ४५३ मिळकतधारकांनी हरकती दाखल केल्या होत्या. कृती समितीच्यावतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनाही साकडे घातले.
दरम्यान कर आकारणी समितीने चार वर्षात शहरात नैसर्गिक व जागतिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा सहानुभूतीपूर्वक विचार करत ९ टक्के कर आकारणीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मिळकतधारकांना दिलासा मिळाला आहे. नऊ टक्के कर आकारणीच्या अंतिम नोटीसा नागरिकांना लवकरच लागू करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी चौहान यांनी सांगितले. बांधकाम अभियंता योगेश गुरव, प्रदीप बोरगे, आतिष काटकर, प्रणाम शिंदे, नंदकुमार चौधरी, अभिजित कांबळे, अमोल कांबळे आदी उपस्थित होते.
------------------------
दृष्टीक्षेप
कुरुंदवाड पालिकेकडून २० टक्के कर आकारणीच्या नोटीसा
मिळकतधारकांसह सर्वपक्षीय कृती समितीकडून हरकत
महापूर, कोरोनामुळे कर माफीची मागणी
२ हजार ७४२ मिळकतधारकांकडून हरकती
कर आकारणी समितीकडून १५ टक्यांची घोषणा
नागरिक, कृती समितीकडून पुन्हा विरोध
अपिलीय समितीसमोर ४५३ मिळकतधारकांच्या हरकती
समितीकडून ९ टक्के कर आकारणीचा निर्णय