
पर्यटन तालुका ठरलेल्या राधानगरीत प्रथमच येत आहेत पर्यटनमंत्री ठाकरे : मोठ्या विकासनिधीच्या घोषणेची अपेक्षा
राधानगरीला विकासासाठी
विकासनिधी घोषणा होणार का?
राज्याच्या पर्यटनमंत्र्यांकडून तालुकावासीयांना अपेक्षा
सुरेश साबळे : सकाळ वृत्तसेवा
कसबा तारळे, ता. १३ : काही वर्षांत पर्यटन तालुका अशी नवी ओळख मिळविलेल्या राधानगरी तालुक्यात राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे रविवारी (ता. १५) येत आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृति स्मारकांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. त्यांच्यासह पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हेही उपस्थित राहणार आहेत. या समारंभाच्या निमित्ताने तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी मोठ्या निधीची घोषणा पर्यटनमंत्री ठाकरे यांच्याकडून होईल व पर्यायाने रोजगार निर्मितीसाठी ते उपयोगी ठरेल, अशी तालुकावासीयांना अपेक्षा आहे.
राधानगरी तालुका डोंगराळ असून येथे उद्योगधंदे नसल्याने तालुक्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठे आहे.
अभिजित तायशेटे यांच्यासह तालुक्यातील काही निसर्गप्रेमी व्यक्ती आणि संस्थांनी या तालुक्याला पर्यटन तालुका अशी नवी ओळख निर्माण करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, माजी खासदार संभाजीराजे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील आदींनी शक्य तितका निधी दिला आहे. त्या माध्यमातून राधानगरी धरण परिसरासह राऊतवाडी धबधबा, दाजीपूर अभयारण्य, फुलपाखरू उद्यान आदी पर्यटकांच्या पसंतीस पडतील अशी काही पर्यटन केंद्रे विकसित झाली आहेत व होत आहेत. फुलपाखरू आणि काजवा महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक संयोजकांनी राधानगरीला पर्यटनाच्या नकाशात स्थान मिळवून दिले आहे. राजर्षी शाहू स्मृती केंद्राच्या लोकार्पण समारंभाच्या निमित्ताने पर्यटन मंत्रीठाकरे पहिल्यांदाच या तालुक्यात येत आहेत. त्यांच्या माध्यमातून या तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी मोठी मदत होणे अपेक्षित आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kst22b01581 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..