
जुन्या वाहनांच्या खरेदीत फसवणूक झाल्याच्या चर्चेने गुडाळ परिसरात खळबळ
गुडाळ परिसरातील अनेकांची
जुन्या वाहन खरेदीत फसवणूक
कसबा तारळे : राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या दलालाने जुन्या वाहनांच्या खरेदीची कागदपत्रे वाहन मालकांना दिली नसल्याने त्यांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. खरेदी झालेली वाहने अधिकृत की चोरीची आहेत याबाबतही संभ्रम आहे. राधानगरी पोलिसांत मात्र कुणीही याबाबत तक्रार केली नसल्याचे समजते. जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीत दलाली करणाऱ्या गुडाळ येथील एकाने या व्यवसायात जम बसविला होता. वाशी, पनवेल, मुंबई परिसरातून जुन्या वाहने आणून तो विक्री करीत होता. गेल्या दोन-तीन वर्षांत अशा जुन्या खरेदी केलेल्या काही वाहनांची कागदपत्रे संबंधितांना मिळाली आहेत तर काहींना ती मिळाली नसल्याचीही चर्चा आहे. या कारणामुळे परिसरातील एका वाहन खरेदीदाराने काही महिन्यांपूर्वी त्याला ‘प्रसाद’ दिल्याचे समजते.
तामगाव येथील एकावर गुन्हा
उजळाईवाडी ः तामगाव (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत चौकात आप्पासो श्रीपती कांबळे (तामगाव) या ज्येष्ठ शेतमजूरास म्हाताऱ्या म्हणत व अपशब्द वापरीत मधुसूदन कांबळे याने अपमानित केले. आप्पासो कांबळे यांनी मधुसूदन यास असे का म्हणतोस असा जाब विचारताच चिडून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच दगडाचा वापर केल्यामुळे डाव्या डोळ्याला जखम झाली. ही घटना शुक्रवारी (ता. २७) रात्री घडली असून घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल खोत करीत आहेत.
ट्रक मागे घेताना कामगार जखमी
उजळाईवाडी ः गोकुळ शिरगाव येथे एका कंपनीजवळ ट्रक मागे घेताना माथाडी कामगार जखमी झाला. बाबासो मारुती चव्हाण (वय ४२, रा. कागले मळा, गोकुळ शिरगाव) असे त्यांचे नाव आहे. ट्रक (एम एच ०९ सी यु २०७६) वरील चालकाने निष्काळजीपणे ट्रक रिव्हर्स घेतल्यामुळे चव्हाण यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. जखमी चव्हाण यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाहूपुरीचे हेडकॉन्स्टेबल जुबीन शेख यांनी फिर्याद दिली. हा गुन्हा शाहूपुरी पोलिसांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याकडे व्रग केला. हेड कॉन्स्टेबल तेलंग तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kst22b01591 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..