
गाव मिटलं पण सरपंच पदासाठी फाटलं..... करंजफेणमध्ये सरपंचपदासाठी निवडणूक होण्यावर शिक्कामोर्तब !
गावचं मिटलं; पण सरपंच पदासाठी फाटलं!
सुरेश साबळे : सकाळ वृत्तसेवा
कसबा तारळे, ता. ९ : राधानगरी तालुक्यातील आध्यात्मिक वारसा जपलेले गाव म्हणून ओळख असलेल्या छोटेखानी करंजफेण या गावची निवडणूक बिनविरोध होणार असे चित्र तयार झाले. सदस्य पदांसाठीच्या ३ प्रभागांतील ७ जागा बिनविरोध निवडून देण्यासाठी सर्व गटा-तटांचे मिळून सातच उमेदवारी अर्ज निवडणूक प्रक्रियेत ठेवले. साहजीकच ७ सदस्य बिनविरोध निवडून आले. परंतु, थेट सरपंचपदासाठी मात्र तीन पैकी दोन उमेदवारांचे अर्ज मदतीपूर्वी माघार न घेतल्याने गावचं मिटलं; पण सरपंच पदासाठी फाटलं, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, सरपंच पदाच्या एका प्रमुख नावासाठी आग्रह धरून अन्य दोन उमेदवारांनी निवडणुकीतून तांत्रिक दृष्ट्या माघार घेतली नसली तरीही सर्वानुमते सरपंच पदासाठी एका नावाचा आग्रह धरून अन्य दोन स्पर्धक उमेदवारांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर करण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, संबंधित दोन इच्छुकांना निवडणूक न लढविण्याचेआवाहन गावातील काही प्रमुख मंडळी करत आहेत. त्याला यश येईल अशी काहींना अपेक्षा आहे. तसे घडले तर सरपंच पदाच्या शर्यतीतून तीनपैकी दोघांनी ऐच्छिक माघार घेत असल्याचे जाहीर करून निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून सरपंच पदासाठी केवळ एका उमेदवाराला मतदान करून निवडणुकीतील कटूता टाळता येऊ शकेल यासाठी आता जोर बैठका सुरू आहेत.