
कसबा तारळे येथे दुरंगी धुमशान : सत्ताधारी गटा विरोधात अन्य प्रमुख गट एकवटले
कसबा तारळेत
दुरंगी लढत
कसबा तारळे, ता. १२ : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले असून सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूंनी प्रचाराला सुरुवात झाली आहे.
सत्ताधारी गटाचे नेतृत्व काँग्रेसचे भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील व त्यांचे वडील, माजी संचालक दत्तात्रय हरी पाटील हे करीत असून त्यांना शेतकरी कामगार पक्षाचा उपगट व शिवसेनेचा एक गट यांची साथ आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक संजयसिंह पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी संचालक दत्तात्रय हणमा पाटील, राष्ट्रवादीचे नेते, माजी संचालक शिवाजीराव पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी संचालक दत्तात्रय धोंडी पाटील, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष, माजी उपसरपंच व्ही. टी. जाधव आणि युवा विकास आघाडी या सर्वांनी मिळून दंड थोपटले आहेत. चार प्रभागातून ११ सदस्य निवडून द्यायचे असून सरपंच पद इतर मागासवर्गीय महिला गटासाठी आरक्षित आहे. सत्ताधारी गटाकडून रवींद्र पाटील यांच्या पत्नी माजी सरपंच विमल पाटील निवडणूक लढवीत असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव पाटील यांच्या समर्थक निलम सचिन पाटील- केळुसकर उभ्या ठाकल्या आहेत.
दरम्यान, युवा विकास आघाडीचे कार्यकर्ते नितीन पोतदार व महाडिक गटाचे स्थानिक नेते दिगंबर सणगर यांनी दोन स्वतंत्र प्रभागातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. साहजिकच एकूण १२ जागांसाठी दोन्ही आघाड्यांकडून २४ व अपक्ष दोन असे २६ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.