औषधनिर्माणशास्त्र : समाजोपयोगी, रोजगाराच्या संधी देणारे क्षेत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औषधनिर्माणशास्त्र : समाजोपयोगी, रोजगाराच्या संधी देणारे  क्षेत्र
औषधनिर्माणशास्त्र : समाजोपयोगी, रोजगाराच्या संधी देणारे क्षेत्र

औषधनिर्माणशास्त्र : समाजोपयोगी, रोजगाराच्या संधी देणारे क्षेत्र

sakal_logo
By

औषधनिर्माणशास्त्र
समाजोपयोगी करिअरची संधी


आजची धकाधकीची जीवनशैली व जीवनशैलीशी निगडित विविध आजारांचे वाढते प्रमाण आदी कारणांमुळे औषधनिर्मिती क्षेत्रात तयार झालेल्या रोजगाराच्या संधीमुळे युवक- युवतींसमोर औषधनिर्माणशास्त्र करिअरसाठीचा चांगला पर्याय आहे. औषधनिर्मिती क्षेत्रामध्ये आज भारताचे जागतिक योगदान खूप मोठे आहे. संपूर्ण जगामध्ये होणाऱ्या औषधनिर्मितीचा विचार करता यामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगाला लागणाऱ्या एकूण लसींपैकी ५० टक्के लसींचे उत्पादन हे भारतामध्ये होते. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला लागणाऱ्या एकूण औषधांपैकी २५ टक्के औषधे भारताकडून पुरविली जातात. यावरून भारताचे जागतिक पातळीवर औषध निर्माणशास्त्रात असलेले महत्त्व आणि योगदान समजून येईल.
- शोभराज माळवी
(प्राचार्य, जेनेसिस फार्मसी कॉलेज, राधानगरी)
......................

औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातून अभ्यासक्रम पूर्ण करून फार्मासिस्ट म्हणूनही समाजसेवेबरोबरच चांगले करिअर घडविता येवू शकते. आजपर्यंत फार्मासिस्टकडे बघताना औषध विक्रेता एवढीच ओळख मिळालेल्या या घटकाला कोरोनासारख्या महामारीनंतर मात्र खऱ्या अर्थाने औषधनिर्माता ही मूळ धारणा प्राप्त झालेली आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून काम करताना फार्मासिस्टचे समाजाप्रती योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच फार्मासिस्टची नैतिक जबाबदारीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्याशी निगडित विविध सेवा पुरविण्यामध्ये फार्मासिस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे.
औषधांची इत्यंभूत माहिती,औषधांचे शरीरावर होणारे चांगले परिणाम, दुष्परिणाम,औषधांचे योग्य प्रकारे वितरण, रुग्णांना योग्य मार्गदर्शन व आवश्यकतेनुसार समुपदेशन, रुग्णांच्या आजाराबाबतचा कौटुंबिक इतिहास, औषधांचे योग्य प्रकारे वर्गीकरण, संशोधन, किफायतशीर दरामध्ये चांगल्या दर्जाची औषधे निर्माण करणे आणि त्यांचा समाजाला पुरवठा करणे, त्याच सोबत समाजामध्ये आरोग्य विषयक जनजागृती करणे इत्यादी विविध महत्त्वाची आणि जबाबदारीची कामे करताना समाजासाठी फार्मासिस्टची भूमिका केंद्रस्थानी राहते.
आज ऑनलाईनच्या जमान्यात ऑनलाइन औषधे खरेदी करणे कदाचित घातक ठरू शकेल. कारण फार्मासिस्टच्या सल्ल्याशिवाय दिली जाणारी औषधे आणि त्या माध्यमातून होऊ शकणारे नुकसान हे विचार करण्यापलीकडचे असेल.
औषधांचा वापर करण्याच्या योग्य पद्धती, रुग्णाचे चांगले समुपदेशन इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी प्रत्यक्षात केवळ फार्मासिस्टच करू शकतो. ऑनलाइनच्या माध्यमातून कुरिअर एजंटकडून औषध घेण्यापेक्षा वेल क्वालीफाईड फार्मासिस्टकडून औषधे आणि सल्ला घेणे कधीही चांगलेच.
एकंदरीतच फार्मासिस्टसारखे वेगळे आणि समाजोपयोगी करिअर करण्याकडे आजच्या युवा पिढीचा कल असणे स्वाभाविक आहे. फार्मासिस्ट म्हणून करिअर करण्यासाठी बारावी विज्ञान शाखेच्या कोणत्याही ग्रुपमधून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी औषधनिर्माणशास्त्र क्षेत्राकडे जाऊन एक चांगलं करिअर घडवू शकतो. बारावी विज्ञान शाखेनंतर दोन वर्षांचा डी.फार्मसी किंवा चार वर्षांचा बी.फार्मसी किंवा सहा वर्षांचा फार्म डी. अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यानंतर एम.फार्म, एमबीए, पीएचडी असे अधिकचे उच्च शिक्षण घेता येते. फार्म डी सारख्या अभ्यासक्रमानंतर तर थेट डॉक्टर पदवी प्राप्त होऊ शकते.
हे विविध अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर स्वतःचे औषध विक्री केंद्र,तसेच मार्केटिंग,औषध निर्मिती, औषध संशोधन, शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन इत्यादी क्षेत्रांमध्ये काम करण्याची चांगली संधी उपलब्ध आहे. औषधनिर्मिती व औषध संशोधन यामध्ये तर वेगवेगळ्या विभागांतर्गत अतिशय चांगल्या आणि उच्च दर्जाच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत
अशा या आव्हानात्मक, दर्जात्मक आणि समाजोपयोगी चांगल्या क्षेत्राचा आजच्या युवा पिढीने नक्की विचार करून या क्षेत्राद्वारे यशाची उच्च शिखरे पादाक्रांत करावीत.