आशा स्वयंसेविका : असंसर्गिक आजार नियंत्रणाचा कणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशा स्वयंसेविका : असंसर्गिक आजार नियंत्रणाचा कणा
आशा स्वयंसेविका : असंसर्गिक आजार नियंत्रणाचा कणा

आशा स्वयंसेविका : असंसर्गिक आजार नियंत्रणाचा कणा

sakal_logo
By

‘आशा’वादी प्रबोधन

दहा वर्षांमध्ये माता व बालकांच्या आरोग्यात आमूलाग्र बदल झाला. आरोग्य संस्थेतील प्रसूतींच्या प्रमाणात झालेली वाढ, नियमित लसीकरणात झालेली वाढ, नवजात शिशू बालकांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा, माता मृत्यू आणि अर्भक मृत्यूच्या प्रमाणात झालेली घट या बाबींचा विचार करता शासकीय आरोग्य सेवेच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेविका, सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांसह त्यांना सहकार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचे योगदान नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. आशा स्वयंसेविका शासकीय कामांसाठी सहकार्याबरोबरच, प्रामुख्याने लोक असांसर्गिक रोगांपासून दूर राहण्यासाठी व ते टाळण्यासाठी महत्त्वाचे प्रबोधनाचे काम करीत आहेत.

- डॉ. राजेंद्रकुमार शेटे, तालुका वैद्यकीय अधिकारी, राधानगरी.
..............................

असांसर्गिक रोगांमुळे होणारे दुष्परिणाम व परिणामी ओढवणारा मृत्यू यांचं प्रमाण पाहता एकूण होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात ६० टक्के मृत्यू हे असांसर्गिक आजारांमुळे होतात. मृत्यूसाठीचे कारण पाहता अशा आजारांचे हे प्रमाण सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे आहे.
१) कोरोनरी हृदयरोग : स्ट्रोक हायपर टेन्शन ४५ टक्के
२) कोरोनरीे रेस्पिरेटरी रोग २२ टक्के
३) कर्करोग १२ टक्के
४) मधुमेह ३ टक्के
सर्वसाधारणपणे ३० वर्षांच्या व्यक्तीचा ७० वर्षे वयाच्या आधी मृत्यू झाल्यास त्याची कारणे पाहता एकूण होणाऱ्या मृत्यूपैकी एक चतुर्थांश होणारे मृत्यू हे वरील चार प्रमुख असांसर्गिक आजारांमुळे होण्याची शक्यता असते. अशा रोगांचे दुष्परिणाम व त्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आशा स्वयंसेविका प्रबोधनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहेत.
जागतिक स्तरावर तंबाखू सेवनाचे प्रमाण २२ टक्के आहे. भारतात मात्र तंबाखू सेवनाचे प्रमाण ४४.५ टक्के पुरुष आणि ६.८ टक्के स्त्रिया असे आहे.
तसेच मधुमेहाचे प्रमाण १२.४ टक्के महिलांमध्ये व १३.४ टक्के पुरुषांमध्ये आढळले आहे.
उच्च रक्तदाबाचे प्रमाण स्त्रियांमध्ये २३.१ टक्के व पुरुषांमध्ये २४.४ टक्के आढळले आहे. असे रोग टाळण्यासाठी जीवनशैलीमध्ये ठरवून आमूलाग्र बदल करणे ही काळाची गरज आहे. विविध कारणांमुळे किंवा असे रोग टाळण्यासाठी चांगल्या सवयी अंगी बाणवणे गरजेचे असते; परंतु तसे आपल्याकडे अजून फारसे होताना दिसत नसल्यामुळे आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून याबाबत सर्वत्र प्रबोधन केले जात आहे.
खरे तर जीवनात चांगल्या आरोग्यदायी सवयींना सर्वांनीच लवकर प्रारंभ करायला पाहिजे. ज्यामुळे चांगल्या सवयी कायमच्या रुजविणे सोपे जाईल. त्याचा फायदा आरोग्यदायी परिवार व परिणामी आरोग्यदायी समाज घडण्यासाठी होईल. साहजिकच आजारपणावर कमी खर्च होऊन जीवनमान उत्तम राहील. कष्टकऱ्यांसाठी तर या सवयी खूप गरजेच्या आहेत. अशा सवयींमुळे आजारी न पडल्याने त्यांची मजुरी बुडीत होण्याची शक्यता कमी राहील. हे समाजातील विविध घटकांना पटवून देण्याचे काम आशा स्वयंसेविका करीत आहेत.
असांसर्गिक आजारांमध्ये वाढ होण्याची कारणे :
* लोक ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जास्त प्रमाणात स्थलांतरित होत आहेत. ज्यामुळे त्यांचा आहार, राहणीमान आणि इतर वर्तन व जीवनशैलीत बदल होत आहे.
* लोकांचे आयुर्मान वाढल्याने वृद्धांची संख्या वाढली आहे.
* वाहनांच्या उपलब्धतेमुळे चालण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
* नियमित व्यायामाकरिता आवश्यकतेनुसार ठिकाण किंवा जागा उपलब्ध होतातच असे नाही.
* सर्व वयोगटांतील लोकांना सहजगतीने तंबाखू व तत्सम पदार्थ, दारू उपलब्ध होत असल्याने व्यसनांमध्ये वाढ होत आहे.
* जलयुक्त, चरबीयुक्त आणि गोड तसेच मिठाचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन अधिक वाढले आहे.
* महागाई व अनुपलब्धतेमुळे पालेभाज्या, फळांचा उपयोग आहारात कमी होत आहे.
* रिफाइंड तेलांच्या खाद्यपदार्थाचे सेवन वाढले आहे. (बंद पाकिटातील पदार्थांचा वापर वाढला आहे).
* अन्न, हवा आणि पाणी असे वातावरणातील प्रदूषण वाढले आहे.
ही सर्व कारणे लोकांना समजावून सांगून त्यांना अशा आजारांपासून दूर राहण्यासाठीचे प्रयत्न आशा स्वयंसेविकांकडून केले जात असतात.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘आशां’ची भूमिका :
आशा स्वयंसेविका उच्च ‌रक्तदाब असलेल्या व्यक्तींना खालील बाबींसाठी प्रवृत्त करतात.
*तंबाखू सेवन टाळण्याबाबत जागृती.
*मद्यपान सेवन कमी करण्याचा सल्ला देणे.
*मिठाचे प्रमाण दिवसात चमचा म्हणजेच ५ मिलिग्रॅमपेक्षा जास्त न घेण्यासाठी प्रबोधन.
*पॉलिश केलेले धान्य, डाळी, जास्त स्निग्ध पदार्थ, तेलकट खाद्यपदार्थ व गोड पदार्थांचे सेवन कमी करण्याचा सल्ला देणे.
*चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स अशा कॅफिन जास्त प्रमाणात असणाऱ्या पदार्थांचे सेवन कमी करून ताजी फळे, पालेभाज्या, सालीच्या डाळी, कडधान्ये यांचा जास्त वापर करण्यास प्रवृत्त करणे.
* ज्यांचे वजन जास्त आहे त्यांना वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रवृत्त.
* व्यायामाचे महत्त्व सांगून योग्य वेळा ठरविण्यासाठी मार्गदर्शन.
*रक्तदाबाची मासिक तपासणी निश्चित करणे.

एकूणच आशा स्वयंसेविकांचे हे प्रबोधनाचे काम समाजातील विविध घटकांना निरोगी आयुष्य लाभण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. म्हणूनच आशा स्वयंसेविका जणू असांसर्गिक आजार नियंत्रणाचा कणा आहेत.