दुर्गमानवाडला गैबी-विठ्ठलाईचा गजर करीत लाखभर भाविकांची गर्दी : आज कसबा तारळेची मुख्य यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्गमानवाडला गैबी-विठ्ठलाईचा गजर करीत लाखभर भाविकांची गर्दी : आज कसबा तारळेची मुख्य यात्रा
दुर्गमानवाडला गैबी-विठ्ठलाईचा गजर करीत लाखभर भाविकांची गर्दी : आज कसबा तारळेची मुख्य यात्रा

दुर्गमानवाडला गैबी-विठ्ठलाईचा गजर करीत लाखभर भाविकांची गर्दी : आज कसबा तारळेची मुख्य यात्रा

sakal_logo
By

फोटो 02227
...

‘गैबी-विठ्ठलाईच्या नावानं चांगभलं’ चा गजर

दुर्गमानवाड यात्रेला लाखो भाविकांची उपस्थिती

कसबा तारळे ता. १९ : ‘गैबी-विठ्ठलाईच्या नावानं चांगभलं’ चा गजर करीत आज राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथे देवी श्री विठ्ठलाईच्या मुख्य यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली. दरम्यान, कसबा तारळे येथील देवी श्री विठ्ठलाईची मुख्य यात्रा उद्या, सोमवारी(ता.२०) होणार आहे.
दुर्गमानवाड येथे आज पहाटे देवीच्या मानकरी गुरव पुजाऱ्यांनी देवीस अभिषेक करून यात्रेनिमित्त विशेष पूजा बांधली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळच्या सत्रापासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दुपारच्या दरम्यान उन्हाच्या तडाख्यातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. रात्री उशिरापर्यंत ती अखंडपणे सुरुच राहिली. एसटीसह दुचाकी, खासगी चारचाकी गाड्यांमधून भाविक देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत येत राहिले. गैबी येथेही मुजावर बंधूंनी पीर-दर्ग्याची पूजा केल्यानंतर या परिसरातही दर्शनासाठी गर्दी राहिली. गैबी ते देवीचे मंदिर हा थोडा अरुंद रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठी गर्दी राहिली. मंदिराच्या दुतर्फा विविध खेळण्यांसह प्रसाद व खाद्यपदार्थ यांचे स्टॉल्स उभारले होते. राधानगरी, निपाणी, कागल, संभाजीनगर व कोल्हापूर आगारांनी यात्रेसाठी खास एसटीच्या जादा फेऱ्या सोडल्या होत्या. रात्री उशिरा नवसाच्या भाविकांनी मंदिर परिसरात फटाक्यांची आतषबाजी केली. येथील श्री गैबी-विठ्ठलाई खेळे मंडळ मशालीसह दुर्गमानवाड येथे देवी श्री विठ्ठलाईच्या मांडावर रात्री पोचल्यानंतर प्रथा -परंपरेप्रमाणे मानपान होऊन करमणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. राधानगरी पोलिसांनी निरीक्षक स्वाती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे पथक दिवसभर तैनात होते.दरम्यान, खेळे मंडळाच्या वतीने मोफत अन्नछत्र सुरू केले असून त्याचा अनेक भाविकांनी आज लाभ घेतला. उद्याही हे अन्नछत्र सुरू राहणार आहे.
.......

उन्हापासून संरक्षणाची गरज

उन्हाच्या तडाख्यात मंदिराच्या मागील बाजूवरून जिन्यावरून चढून पुन्हा खाली उतरताना भाविकांच्या घामाच्या धारा निथळत होत्या. ही उन्हाची काहीली थांबविण्यासाठी तेथे तात्पुरती सावली उभा करण्याची गरज अनेक भाविकांनी व्यक्त केली.