
ग्रामपंचायतीमधील सर्व दाखले घरबसल्या मिळणार
घरबसल्या मिळणार दाखले
‘पंचायत राज’तर्फे सिटिझन कनेक्ट ॲप लाँच
राजू मुजावर / सकाळ वृत्तसेवा
कुंभोज, ता. २८ ः महाराष्ट्र शासनाकडून आॅनलाईन पध्दतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा देता येईल, याकडे लक्ष दिले जात आहे. यापूर्वी केवळ जमिनाचा सात-बारा उतारा आॅनलाईन पध्दतीने काढला जात होता. मात्र,यापुढे मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून गावठाणमधील जागेचा उतारा, ग्रामपंचायतीमध्ये मिळणारे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र यासारखे अनेक दाखले मिळणार आहेत. पंचायत राज विभागाने नुकताच लाँच केलेल्या ॲपच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्यांची माहिती, यापूर्वी कराचा भरणा केलेल्या सर्व कराच्या रकमेची माहितीही मिळेल.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागामार्फत महा ई ग्राम सिटीझन कनेक्ट नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन अॅप लाॅच केले आहे. हे अॅप मोबाईलमध्ये इंस्टाॅल करून गावातील नागरिक घरबसल्या ग्रामपंचायतीमधून मिळणारे दाखले काढू शकतात. त्यामुळे त्यांची वेळेची बचत होणार असून, दाखल्याकरिता ग्रामपंचायतीला फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. वेळेतच त्यांना घरबसल्या दाखले मिळणार आहेत, तर ग्रामपंचायतीला या माध्यमातून नागरिकांकडून मिळणारे गृहकर वसूल करणे सोयीचे झाले. वसुलीत येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.
हे दाखले मिळणार
या मोबाईल अॅप्लिकेशन अॅपच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, दारिद्ररेषेखालील प्रमाणपत्र, नमुना ८, असेसमेंट उतारा ही प्रमाणपत्र मिळणार आहेत. याशिवाय अॅपच्या माध्यमातून घरबसल्या घराचा कर भरणाही करता येईल.
....................
चौकट
असे करा अॅप इंस्टाॅल
मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमधून महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट अॅप इन्स्टॉल करा. अॅप ओपन करून रजिस्टर करा. त्यामध्ये नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडीसह सर्व माहिती जतन करा. यानंतर मिळालेल्या युजर पासवर्ड व्दारे लाॅगीन करा.