हसन मुश्रीफ यांना दिलासा

हसन मुश्रीफ यांना दिलासा

मुश्रीफ ईडी कार्यालयात
हजर; आज पुन्हा येणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई उच्च न्यायालयाने ईडीच्या अटकेपासून दोन आठवड्यांचे संरक्षण दिल्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ मंगळवारी ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही होते. दरम्यान, ईडीने मुश्रीफ यांना बुधवारी (ता. १५) चौकशीसाठी बोलावले आहे.
ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर मुश्रीफ प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले, ‘न्यायालयाकडून मला दोन आठवड्यांचा दिलासा मिळाला आहे. हा दिलासा मिळाल्यानंतर मी तातडीने ईडी कार्यालयात आलो. त्यांचे काही प्रश्‍न आहेत. त्या प्रश्‍नांना उत्तर देण्यासाठी मी येणार आहे. विधिमंडळाचं सध्या अधिवेशन सुरू आहे; पण ईडी बोलवेल तेव्हा मी चौकशीसाठी येईन आणि सर्व सहकार्य करेन.’

मुश्रीफांना कारवाईपासून
दोन आठवड्यांसाठी संरक्षण
मुंबई : ईडीकडून तपास सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयाने आज माजी कामगार मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांना दिलासा दिला. त्यांच्याविरोधात पुढील दोन आठवडे कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
उच्च न्यायालयात याचिका दाखल असताना मुश्रीफ यांच्या कारखान्यांवर ईडीने छापासत्र सुरूच ठेवले आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी न्यायालयात पुन्हा नव्याने फौजदारी याचिका दाखल केली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठापुढे आज याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने तूर्तास मुश्रीफ यांना दोन आठवडे ईडीच्या कारवाईपासून संरक्षण दिले आहे. तसेच नियमित अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
सदर प्रकरणात अद्याप मुश्रीफ आरोपी नाहीत. त्यामुळे त्यांनी हवे तर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा. थेट कारवाई रद्दबातल करण्यासाठी याचिका करू नये, असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. दरम्यान, अन्य प्रकरणात ईडी मुश्रीफ यांच्याबाबत तपास करू शकतात, असा दावा सिंह यांनी केला. ज्या कारखान्यात तपास सुरू आहे त्याच्याशी मुश्रीफ यांचा संबंध नाही, असेही या वेळी सांगण्यात आले. मात्र, त्यांची तीन मुले आबिद, नावेद आणि साजिद हे साखर कारखान्याचे पदाधिकारी असून तिघांनीही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com