
ग्रामपंचायतीची कागदपत्रे मिळणार घरबसल्या
ग्रामपंचायतीची कागदपत्रे मिळणार घरबसल्या
---
ग्रामविकास सज्ज; महा-ई-ग्राम सिटिझन पोर्टल कार्यान्वित
गणेश बुरुड : सकाळ वृत्तसेवा
महागाव, ता. २३ : शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत पंचायत ई प्रणाली अंतर्गत ग्रामपंचायतीद्वारे देण्यात येणारे महत्त्वपूर्ण दाखले व कागदपत्रे आता महा-ई-ग्राम सिटिझन कनेक्ट पोर्टलद्वारे घरपोच मिळणार आहेत. त्यामुळे आता पारदर्शक कारभाराच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
राज्य शासनातर्फे ग्रामीण भागात पारदर्शक व स्वच्छ कारभारासाठी ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना आवश्यक असलेले महत्त्वाचे दाखले ‘महा-ई-ग्राम सिटिझन कनेक्ट’ या मोबाईल पोर्टलद्वारे देण्यात येणार असल्याने नागरिकांना आता ग्रामपंचायतीत फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नाही. जन्म-मृत्यू, विवाह नोंद, दारिद्र्यरेषेचा दाखला, नमुना नंबर आठ, गावठाण प्रमाणपत्र आदी दाखले आता मोबाईलद्वारे घरपोच मिळणार आहेत. या व्यतिरिक्त इतर सर्व दाखले, स्वयंघोषणापत्र पत्राद्वारे असल्याने त्यासाठी ग्रामपंचायतमधील कोणताही अधिकारी, सरपंच व उपसरपंच यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता भासणार नाही.
----------
ऑनलाइन रक्कम भरण्याची सुविधा
घरबांधकाम करण्यासाठी यापूर्वी ग्रामपंचायतीची परवानगी घेणे अनिवार्य होते. आता यात बदल केला आहे. आता तीन हजार स्क्वेअर फुटांपर्यंत बांधकामासाठी परवानगीची गरज नाही. त्यापेक्षा अधिक बांधकामासाठी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी आवश्यक आहे. महा-ई-ग्राम सिटिझन पोर्टल कार्यान्वित झाल्याने आता कोणतीही अडवणूक होणार नाही. घरबसल्या एका क्लिकवर दाखले मिळणार आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतींतर्गत कराची रक्कमही आता ऑनलाइनद्वारे ग्रामपंचायतीच्या थेट खात्यात जमा होणार असल्याने लोकप्रतिनिधीच्या अवाजवी खर्चावर चाप बसेल.